
काही आठवड्यांपूर्वी विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. विजय शिवतारे बारामीतमधून अपक्ष निवडणूक लढवणार असंच सगळ्यांना वाटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांची भेट घेऊन समजूत काढली. विजय शिवतारे आता महायुतीसाठी प्रचार करत आहेत. विजय शिवतारे यांची आताची वक्तव्या पाहिल्यानंतर ते हेच शिवतारे होते का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. विजय शिवतारे यांनी पुण्यात अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी TV9 मराठीशी संवाद साधला. पुणे जिल्ह्यातून महायुतीचे चारही उमेदवार 1 हजार टक्के निवडून येतील, असा विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
“ही भावकी-गावकी, नणंद-भावजय अशी लढाई नाहीय. राष्ट्रीय लोकसभेची ही निवडणूक आहे. देशाची सत्ता तिसऱ्यांदा मोदींच्या हाती देण्यासाठी ही निवडणूक आहे. महायुतीच मत मोदींसाठी आहे. ते ही निवडणूक नक्की जिंकतील” असा विश्वास विजय शिवतारेंनी व्यक्त केला. बारामतीची निवडणूक हाय वोलटेज मानली जातेय, त्यावर विजय शिवतारे म्हणाले की, “नणंद-भावजय, सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे अशी ही निवडणूक नाहीय. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवणारी ही निवडणूक आहे”
‘खासदारच काम काय? हे विचारा’
‘भावात्मक रंग देऊन अपयश झाकण्याचा प्रयत्न होतोय’ असा टोला विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. “मागच्या 15 वर्षात विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघात, गावात जा. खासदारच काम काय? हे विचारा, तुम्हाला उत्तर मिळेल” असं विजय शिवतारे म्हणाले. रखडलेले जे प्रकल्प होते, विमानतळाच काय झालं? आपण काय केलं? किती बैठका घेतल्या? असा सवाल विजय शिवतारे यांनी विचारला.
‘बंधुंकडे 25 कोटी का नाही मागितले?’
“118 कोटीची पाणी पुरवठा योजना बंद पडलेली. तुम्ही बंधुंकडे जाऊन 25 कोटी मागितले असते, तर 4.50 लाख लोकांना पाणी मिळालं असतं. अर्थमंत्री म्हणून त्यांनी दिले असते, तुम्ही का नाही गेलात?. पाणी पुरवठा योजना बंद पडलेली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी 25 कोटी दिले, त्या गावांमध्ये आता पाणी मिळतय. जे प्रकल्प रखडलेले होते, त्यासाठी का प्रयत्न केला नाही?. खासदार म्हणून जबाबदारी होती” अशी टीका विजय शिवतारे यांनी केली.