
Sanjay Raut On Amit Shah Devendra Fadnavis : “देशाच्या सुरक्षेला औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करु शकत नाही. भाजप करु शकते. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? आघाडीवाले आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, श्रीमान उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेता बनले”, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील सभेदरम्यान केले. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. “अमित शाहांची पुण्यातील भाषा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा सहन केली जाणार नाही”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
“उद्धव ठाकरेंना ते औरंगजेब फॅन क्लब असं म्हणतात. पण आम्ही जिना फॅन क्लबमध्ये सहभागी नाही. पाकिस्तानात जाऊन जिनाच्या कबरीवर फुलं उधळणारे आम्ही नक्कीच नाही किंवा पाकिस्तानात जाऊन नवाब शरीफ यांचा केक कापण्यात किंवा तो खाण्यात आम्हाला अजिबात रस नाही. त्यांना महाराष्ट्राचा पराभव जिव्हारी लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. तरीही या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा दारुण पराभव केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्हीही व्यक्ती देशातील राजकारणातील सन्माननीय व्यक्ती आहेत. भाजपसारख्या खोटारडेपणाच्या मशीन्स लावून आम्ही काम करत नाही. आम्ही ईव्हीएमचे घोटाळे, निवडणूक रोखे आणि ईडी सीबीआयचे घोटाळे करुन आम्ही जिंकत नाही. आम्हाला जनतेने स्पष्ट आणि स्वच्छ मार्गाने विजयी केलेलं आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.
“काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते. महाविकासआघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा, ही कोणती भाषा आहे. तुम्ही एका गुंडाची भाषा वापरत आहात, या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळलेली आहे. रस्त्यावर गुंडगिरी सुरु आहे, महिलांवर अत्याचार सुरु आहेत आणि तुम्ही म्हणताय की महाविकासआघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा. म्हणजे हा पराभव तुमच्या इतका आरपार गेला आहे. देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही. अमित शाहांची पुण्यातील भाषा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा सहन केली जाणार नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.
“महाविकासआघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा म्हणजे तुम्ही ठोकशाहीची भाषा करत आहात. देवेंद्र फडणवीस अमित शाहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि ही भाषा करुन दाखवावी. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. ईडी, सीबीआयची हत्यारे लावून येऊ नका. तुमच्यात दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवा आणि या. मग आम्ही तुम्हाला बघतो. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. पण यांच्या डोक्यात औरंगजेब आहे. यांनाच महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब हवा आहे. हेच औरंगजेबाचे फॅन आहेत. त्यांनीच ठिकठिकाणी फॅनक्लब सुरु केले आहेत. यांना हिंदू मुसलमान दंगली घडवायच्या आहेत आणि निवडणुका जिंकायच्या आहेत. म्हणून यांच्या तोंडात आणि मनात औरंगजेब आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले.