ठाकरे सरकार जागरुक राहिल्यानेच कोरोना आटोक्यात, आता तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या, राऊतांचे भाजपला टोले

| Updated on: Oct 20, 2021 | 7:11 AM

भाजपच्या आंदोलनानंतर लॉकडाऊन उघडले नाही तर डॉक्टरांच्या 'टास्क फोर्स'ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले. तेव्हा आता आम्हालाही जगू द्या आणि तुम्हीही जगा, असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊतांनी विरोधी पक्ष भाजपला लगावला आहे.

ठाकरे सरकार जागरुक राहिल्यानेच कोरोना आटोक्यात, आता तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या, राऊतांचे भाजपला टोले
संजय राऊत
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. पण भाजपच्या आंदोलनानंतर लॉकडाऊन उघडले नाही तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले. तेव्हा आता आम्हालाही जगू द्या आणि तुम्हीही जगा, असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊतांनी विरोधी पक्ष भाजपला लगावला आहे.

ठाकरे सरकार जागरुक राहिल्यानेच कोरोना आटोक्यात

कोरोना संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन जितके महाराष्ट्राने केले, तितके ते अन्य राज्यांनी केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राने कोणत्याही बाबतीत घिसाडघाई न करता अत्यंत सावधपणे लॉक डाऊनचे टाळे उघडले आहे. दिवाळीपूर्वी सरकारने निर्बंध शिथिल केले असून दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा परवानाच जनतेला दिला. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने रात्री 12 पर्यंत उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व अॅम्युझमेंट पार्कसुद्धा उघडली जात आहेत. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होत आहेत. मॉल्स आधीच उघडले आहेत.

विरोधी पक्षाच्या आंदोलनानंतर नाही तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’च्या मान्यतेनंतरच मंदिरं उघडलं!

देवळेही बंधमुक्त आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला होता. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले.

थाळ्या आणि घंटांनी नाही तर विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचले

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आपल्या प्रिय पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ असा दिव्य संदेश दिलाच होता. पण थाळ्या वाजवून उपयोग झाला नाही व कोरोनामुळे जशा जागोजाग चिता पेटल्या तशी गंगेच्या प्रवाहातही शेकडो प्रेतांना जलसमाधी देण्यात आली. त्यामुळे थाळ्या आणि घंटा यापेक्षा विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचवत असते. महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉक डाऊनचे टाळे उघडता आले.

शोषण करु नये, हीच अपेक्षा

मुंबई चोवीस तास जागी आहे असे म्हणतात ते याच खाद्य संस्कृतीमुळे, पण लॉक डाऊनच्या निर्बंधांमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील हा जिताजागता व्यवसायही बंद पडला. रेस्टॉरंट, जागोजागचे गजबजते ढाबे बंद पडल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आता हा व्यवसाय नव्याने सुरू होत असला तरी पोलीस व स्थानिक प्रशासनाने या व्यावसायिकांचे फालतूचे शोषण करू नये हीच अपेक्षा.

जगा आणि जगू द्या

कायद्याचे बडगे दाखवणे वगैरे ठीक, पण कायद्याचे बडगे दाखवून गरीबांचे रोजगार बंद पडत असतील तर ते माणुसकीला धरून नाही. देवळांचेही एक अर्थकारण असते. अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहे. पोलीस, प्रशासन यांचेही काम त्यातून भागत असते हे आडपडदा ठेवून सांगायची गरज नाही. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका!

(Shivsena Sanjay Raut taunt BJP over Lockdown relaxation)

हे ही वाचा :

Amarinder Singh New Party | मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करणार, भाजपशी युती करण्याची शक्यता

ऊस परिषदेत राजू शेट्टींचा एल्गार, ऊस एफआरपीच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि भाजपवर हल्लाबोल