अहमद शाह अब्दाली पाहिजे की मी?; तुम्हीच ठरवा; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना सवाल

"तुम्ही मला औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत तुम्ही अहमदशाह अब्दाली असाल, आहातच तर मी कशाला घाबरू", असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अहमद शाह अब्दाली पाहिजे की मी?; तुम्हीच ठरवा; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना सवाल
| Updated on: Aug 03, 2024 | 3:20 PM

Uddhav Thackeray on Amit Shah : “तुम्ही मला औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ अडखळत नाही. तुम्ही अहमदशाह अब्दाली असाल, आहातच तर मी कशाला घाबरु. हा अहमद शाह अब्दाली पाहिजे की मी पाहिजे हे तुम्ही ठरवा”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. पुण्यात आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

“शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतला नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते. त्यांचे मोहरके आले. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं.

तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असं शंकराचार्य म्हणाले. तुम्ही काय करता. १९४०पासून तुमचे पूर्वज काढा. श्यामाप्रसाद मुखर्जी. तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे, नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे. त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता. तुमचं काय आहे ते सांगा?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

“होय, मी त्याला अब्दालीच म्हणतोय”

“वाघ नख आणत आहेत. त्या नखाच्या मागे वाघ नसेल तर त्याला काय अर्थ आहे. शिवाजी महाराज त्या नखांच्या मागे होते म्हणून त्याला अर्थ होता. नखांच्या मागे मुनगंटीवार असून काय फायदा. महाराजांची वाघ नखं म्हणजे महाराष्ट्रातील जनता आहे. हीच वाघ नख घेऊन जो अब्दाली चालत आला आहे. होय मी त्याला अब्दालीच म्हणतोय. तुम्ही मला नकली संतान म्हणता तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्ही मला औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत तुम्ही अहमदशाह अब्दाली असाल, आहातच तर मी कशाला घाबरू. हा अहमद शाह अब्दाली पाहिजे की मी पाहिजे हे तुम्ही ठरवा”, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“पावसाचं थैमान झाल्यावर भगव्याचं थैमान होणार आहे”

“महाराष्ट्राचा अभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात अभिमानाने भगवा हातात घेऊन नाचणारा शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवा. मशाल घरोघरी घेऊन जा. अनेक शाखांच्या बोर्डवर धनुष्यबाण आहे. तो काढून टाका. तिथे मला मशाल असला पाहिजे. तुम्ही नखं घेऊन बसा, वाघ माझ्याकडे आहे. भाजपकडे वाघ नाही. ही निवडणूक कधीही घ्या. पावसाचं थैमान झाल्यावर भगव्याचं थैमान होणार आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.