शिवसेनेचं नवं प्रचारगीत आंध्रची नक्कल? प्रशांत किशोर समान दुवा

| Updated on: Oct 09, 2019 | 5:00 PM

शिवसेनेचं प्रचारगीत लाँच होऊन एक दिवस होत नाही तोच यावर एक वाद तयार झाला आहे.

शिवसेनेचं नवं प्रचारगीत आंध्रची नक्कल? प्रशांत किशोर समान दुवा
Follow us on

मुंबई : निवडणुकीत मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी अनेक पक्ष आपले प्रचारगीत तयार करत असतात. शिवसेनेने देखील मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात आपलं नवं प्रचारगीत (Shivsena Campaign Song) लाँच केलं. अवधुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांनी या प्रचारगीताची निर्मिती केली. मात्र, हे प्रचारगीत लाँच होऊन एक दिवस होत नाही तोच यावर एक वाद तयार झाला आहे. शिवसेनेचं हे नव प्रचारगीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या वाय. एस. आर. काँग्रेस पक्षाच्या गाण्याची नक्कल असल्याचा आरोप शिवसेनेवर होत आहे.

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि वाय. एस. आर. काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी या दोघांच्या प्रचाराची धुरा प्रचार तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्याकडे आहे. प्रशांत किशोर निवडणुकीतील प्रचार रणनितीतील तज्ज्ञ मानले जातात. त्याच्या संकल्पनेतूनच ही नक्कल झाली असावी, असाही आरोप होत आहे.

 

शिवसेनेच्या प्रचारगीताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होते. पुढे भगवा झेंडा आणि शिवसैनिकांच्या जल्लोषाचे अनेक क्षण यात दाखवण्यात आले आहे. याच्या पार्श्वभूमीवर गाणं सुरू आहे. अनेक ड्रोन शॉट्सचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही या प्रचारगीतात प्रामुख्याने दाखवलं आहे. आदित्य ठाकरेंच्या लाँचिंगसाठीच हे गाणं आणल्याचीही चर्चा आहे.

दुसरीकडे जगनमोहन रेड्डी यांच्या प्रचारगीताचाही फॉरमॅट असाच आहे. त्यांच्या गाण्याची सुरुवात रेड्डी यांच्या वाय. एस. आर. काँग्रेसच्या एका वृद्ध समर्थकापासून होते. पुढे गाण्यात अनेक ठिकाणी ड्रोनच्या मदतीने घेतलेल्या भव्य दृष्यांद्वारे जगनमोहन रेड्डींना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादाला केंद्रीत केलं आहे.

विशेष म्हणजे रेड्डी यांच्या प्रचाराच्या या झंझावातात ते प्रचंड बहुमताने आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर आले आहेत. त्यामुळे शिवसेनाही याची पुनरावृत्ती करणार का हे पाहावे लागेल. मात्र, या चर्चेऐवजी सध्या शिवसेनेने गाण्याची नक्कल केल्याचीच अधिक चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसैनिकांकडून गाण्याच्या नक्कलेचा आरोप फेटाळण्यात येत आहे. शिवसेनेने याआधीही प्रचारगीत तयार केले होते. ते शिवसैनिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. आताचं हे गीतही त्यांचं पुढचं पाऊल असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.