शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार : सुधीर मुनगंटीवार

| Updated on: Nov 07, 2019 | 12:06 PM

भाजपची शिवसेनेसोबत युती असून त्यांच्यासोबतच सत्तास्थापन करण्याची आमची इच्छा आहे. भाजपचा दुसरा कोणताही विचार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार : सुधीर मुनगंटीवार
Follow us on

मुंबई : संजय राऊत यांना अपेक्षित असलेली गुड न्यूज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत. त्यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार अशी गुगली मुनगंटीवारांनी टाकली. त्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला दुजोरा देतानाच मुनगंटीवार यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याच्या मागणीवर पडदा (Sudhir Mungantiwar on Maharashtra CM) टाकला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये भावाचं नातं आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना-भाजपचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत. त्यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. नितीन गडकरी महाराष्ट्रात परतणार नाहीत, ते मुख्यमंत्री होणार नाहीत, असंही मुनगंटीवारांनी सांगितलं.

भाजपची शिवसेनेसोबत युती असून त्यांच्यासोबतच सत्तास्थापन करण्याची आमची इच्छा आहे. भाजपचा दुसरा कोणताही विचार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

मुनगंटीवार सारखे ‘गोड बातमी’ म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना

राज्यपालांना आज दुपारी दोन वाजता आम्ही भेटायला जाणार आहोत. मात्र आज सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ‘टीव्ही9 मराठी’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. स्थिर सरकार देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. सत्तास्थापनेसाठी दावा कारायचा की नाही याबद्दल चर्चा करणार आहोत, असं मुनगंटीवार म्हणाले.

राज्यपालांनी अकरा वाजताची वेळ दुसऱ्या कोणालातरी दिली होती. साडेदहा ते अकरा या वेळात आमची चर्चा पूर्ण होणारी नव्हती. त्यामुळे आम्ही वेळ बदलून दुपारची मागितली, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

कुणीही आमदारांना धमकवण्याचं काम करणार नाही. शिवसेना आणि भाजपचा आमदार फुटणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवारांनी दिली. संजय राऊत यांचा आम्ही आदर करतो, डेडलॉक तोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असंही ते म्हणाले.

संघाच्या दृष्टीने मुख्यमंत्री कोण हे महत्त्वाचं नाही. रा. स्व. संघ ही देशहितासाठी दक्ष असणारी संघटना आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना देश हितासाठी भेटू शकतात. संघाचं प्रेम हे भाजप नेत्यांवरही आहे, उद्धवजींवरही आहे आणि काँग्रेसवरही आहे, असंही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Maharashtra CM) म्हणाले.