
Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा खेळ खेळताना दिसले. तसा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या एका विधानाने आता कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत तुमचं काय मत आहे, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
तसेच, तटकरे लातूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या टेबलवर पत्ते टाकले होते तसेच कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. या घटनेनंतर छावा संघटनेच्या संबंधित पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील होते. ते मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यांच्यावरही मोठी कारवाई करण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. चव्हाण यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशानंतर सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
तसेच काल माझा लातूरचा दौरा झाला. या काळात मी पत्रकारांशी एक तास संवाद साधला. त्यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्र्यांच्या रमी गेम खेळतानाच्या व्हिडीओबाबत त्यांचा तीव्र संताप व्यक्त केला. त्यांचा तो अधिकारही आहे. त्यांनी पत्तेही माझ्या टेबलावर टाकले. तरीही मी त्यांचे निवेदन घेतले. त्यांचे मी आभारही मानले, अशी माहिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, आता तटकरे यांच्या सूचक विधानानुसार माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांत चर्चा होणार आहे. त्यानंतर त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हे ठरवले जाईल. मात्र तटकरेंच्या विधानानंतर आता भविष्यात आणखी एक राजीनामा पडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.