Sushma Andhare : ‘सुषमा अंधारे अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, आमच्यामुळे त्या….’

| Updated on: Nov 01, 2022 | 10:28 AM

सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाच्या आमदाराची टीका! म्हणाले, सुषमा अंधारे यांनी आमचे आभार मानले पाहिजेत, कारण...

Sushma Andhare : सुषमा अंधारे अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, आमच्यामुळे त्या....
सुषमा अंधारे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

जळगाव : सुषमा अंधारे (Sushma Andhare) या अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, असं वक्तव्य जळगावमधील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी केलं आहे. सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांचे आभार मानले पाहिजेत, असंही ते पुढे म्हणाले. बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्राच्या जनतेला सुषमा अंधारे यांनी ओळखलं, असं वक्तव्य किशोर पाटील यांनी केलंय. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना समर्थन दिल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने त्यांनी बंडखोरांना वेळोवेळी डिवचलं होतं. सुषमा अंधारे यांची जळगावमध्ये सभा होणार आहे. त्या बाबत बोलताना पत्रकारांनी किशोर पाटील यांना प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना किशोर पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर खोचक टीका केलीय.

किशोर पाटील यांनी म्हटलं की, शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीआधी सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात कुणीही ओळखत नव्हतं. जळगावातील सभेसाठी सुषमा अंधारे यांचं मी मनापासून स्वागत करेन असं सांगताना किशोर पाटील म्हणाले की,…

सुषमा अंधारे यांनी 40 बंडखोरांचे मनापासून आभार मानले पाहिजे. मागच्या तीन महिन्यांपूर्वी सुषमाताई अंधारे कुठे आहेत, हे अंधारात सुद्धा दिसत नव्हतं… अशा प्रकारची परिस्थिती अंधारे ताईंची होती.

हे सुद्धा वाचा

परंतु आज आम्ही बंड केल्यामुळे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रात अंधारे ताई कोण आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडतंय.

त्यामुळे सुषमा ताईंनी आमचे आभार मानले पाहिजे, की आम्ही जर बंड केलं नसतं, तर महाराष्ट्राच्या जनतेने अजूनही अंधारे ताईंना ओळखलं नसतं.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, यावेळी बोलताना किशोर पाटील यांनी मंत्रिपदाची अपेक्षाही व्यक्त केली. जनतेचे आशीर्वाद असतील तर मला संधी मिळेल, पण मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो, असंही किशोर पाटील यांनी म्हटलंय.

जळगावात सध्या भावी मंत्री म्हणून किशोर पाटील यांच्या शुभेच्छांचे बॅनरही लागलेत. पाचोरामध्ये किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी किशोर पाटील यांनी मंत्रिपदाची अपेक्षा बोलून दाखवली.

शिंदे गटाचा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार किशोर पाटील यांचं नाव नव्हतं. त्यामुळे किशोर पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर बोलताना किशोर पाटील यांनी मात्र मी नाराज नसल्याचं सांगत ‘स्वत:ला मुख्यमंत्री समजतो’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुनही चर्चांना उधाण आलं होतं.