Nanded : चर्चा भाजपमध्ये प्रवेशाची अन् अशोक चव्हाण तर भारत जोडो यात्रेच्या तयारीत..!

| Updated on: Oct 02, 2022 | 2:14 PM

एकनाथ शिंदे हे काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. मात्र, याबाबत कॅमेऱ्या समोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मी ऑन रेकॉर्ड यावर काही बोलणार नाही असेही चव्हाण म्हणाले.

Nanded : चर्चा भाजपमध्ये प्रवेशाची अन् अशोक चव्हाण तर भारत जोडो यात्रेच्या तयारीत..!
कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण
Follow us on

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. एवढेच नाहीतर मध्यंतरी गणेशोत्सावत त्यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेटही झाली होती. याबाबत अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी आता त्यांचे म्हणणे समोर आले आहे. याबाबत आपण कुठेही काही म्हणालो नाही. काहीजण अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. त्यांना मी का उत्तर देऊ असे म्हणत त्यांनी वेळ तर मारुन नेली पण मनात नेमके काय आहे? हे स्पष्ट केलेले नाही. तर दुसरीकडे पुढील महिन्यात भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल होत असून त्याचे नियोजनही त्यांच्याकडेच असल्याचे सांगितले.

शिंदे गटात इनकमिंग सुरु असतानाच अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याला पार्श्वभूमीही तशीच होती. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण हे नाराज होते तर विधान परिषद निवडूकीत अंतर्गत मतभेद वाढल्याचे समोर आले होते. तेव्हापासून अशा चर्चांना सुरवात झाली होती.

भाजप पक्ष प्रवेशाबाबत आता चव्हाण यांनीच खुलासा केला आहे. भाजपात प्रवेश अशा बाबतीतले कोणतेही विधान आपण केले नाही. या केवळ अफवा आहेत आणि दुसऱ्यांनी उठवलेल्या वावड्यांना मी का उत्तर देऊ असा उलट प्रश्न त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे हे काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. मात्र, याबाबत कॅमेऱ्या समोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मी ऑन रेकॉर्ड यावर काही बोलणार नाही असेही चव्हाण म्हणाले. वास्तव काय आहे ते शिंदेना विचारा असे चव्हाण म्हणाले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात दाखल होत आहे. नांदेड जिल्ह्यातून या यात्रेला सुरवात होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील देगलूर येथे ही यात्रा येणार आहे. राज्यात 18 दिवसांचा मुक्काम असणार तर दरम्यानच्या काळात 360 किमीचा प्रवास या यात्रेचा असणार आहे.