राज्यातील या सात मतदारसंघांचा तिढा अजूनही कायम

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले आहेत, पण सर्वच पक्षांसमोर काही मतदारसंघांसाठी डोकेदुखी सुरुच आहे. यामध्ये माढा, जळगाव, ईशान्य मुंबई, पालघर, उत्तर मुंबई, पुणे आणि रावेरच्या जागेचा समावेश आहे. काँग्रेसला पुण्यात अजूनही उमेदवार मिळालेला नाही, तर भाजपचा माढ्यातला उमेदवार ठरलेला नाही. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रावेरचा उमेदवार अजूनही गुलगस्त्यात आहे. माढा माढा मतदारसंघ भाजप […]

राज्यातील या सात मतदारसंघांचा तिढा अजूनही कायम
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले आहेत, पण सर्वच पक्षांसमोर काही मतदारसंघांसाठी डोकेदुखी सुरुच आहे. यामध्ये माढा, जळगाव, ईशान्य मुंबई, पालघर, उत्तर मुंबई, पुणे आणि रावेरच्या जागेचा समावेश आहे. काँग्रेसला पुण्यात अजूनही उमेदवार मिळालेला नाही, तर भाजपचा माढ्यातला उमेदवार ठरलेला नाही. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रावेरचा उमेदवार अजूनही गुलगस्त्यात आहे.

माढा

माढा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केलाय. या मतदारसंघातून अजून भाजपचा उमेदवार जाहीर झालेला नाही. इथे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला. पण ते लोकसभा लढण्यासाठी उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नवीन नावाचा शोध भाजपकडून सुरु आहे. माढ्यात रणजितसिंह मोहिते पाटलांसोबतच, विजयसिंह मोहिते पाटील, साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून इथे संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुणे

भाजपने मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देऊन प्रचारात आघाडी घेतली असली तरी काँग्रेसला पुण्यासाठी अजून उमेदवारच सापडलेला नाही. आयात उमेदवार देण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचा पुण्यातला प्रचारही थंडावलाय. कार, प्रचार नेमका करायचा कुणासाठी असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडलाय. अरविंद शिंदे, प्रविण गायकवाड आणि अभय छाजेड ही नावं चर्चेत आहेत.

उत्तर मुंबई

भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. नुकतीच काँग्रेसवासी झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला इथून उमेदवारी दिली जाऊ शकते.

पालघर

पालघरमध्ये शिवसेनेने भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन अनिश्चितता संपविली आहे. पण बहुजन विकास आघाडीकडून कोण याबाबतची उत्सुकता कायम आहे. कारण, काँग्रेस-राष्ट्रवादी-बविआ यांच्या महाआघाडीमध्ये ही जागा बविआसाठी सोडण्यात आली आहे.

ईशान्य मुंबई    

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी कायम आहेत. कारण, ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

रावेर

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्याविरुद्ध विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नव्हे, तर अद्याप जागेची निश्‍चिती झालेली नाही. ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. काँग्रेसने या जागेची मागणी केली आहे. पण याबाबत निर्णय झालेला नाही.

रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारीची ऑफर देऊन प्रवेशासाठी गळ घातली आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. आपण याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेट घेण्यासाठी मुंबईत आल्याचंही त्यांनी सांगितलं.

सांगली

काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते प्रतिक पाटील यांना पक्षालाच रामराम ठोकलाय. वसंतदादा कुटुंबाला डावलल्यामुळे सांगलीत काँग्रेसमध्येच फूट पडली आहे. स्वाभिमानीने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. आघाडीच्या उमेदवाराची लढत भाजपच्या संजय पाटलांशी होईल.