बीडमध्ये मेटेंना मोठा धक्का, 'शिवसंग्राम'चे दोन झेडपी सदस्य भाजपात

बीडमध्ये मेटेंना मोठा धक्का, 'शिवसंग्राम'चे दोन झेडपी सदस्य भाजपात

बीड : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. याचीच प्रचिती बीडमध्ये आली आहे. कार्यकर्ते नाराज असल्यामुळे मी पंकजा मुंडे यांच्या सोबत काम करणार नाही, असा सज्जड इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला होता. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे अशी या सदस्यांची नावे असून  पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे पहिल्यांदाच विधानसभेसाठी निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. मात्र काही मतांनी विनायक मेटे यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम, जिल्हा परिषदमध्ये विनायक मेटे यांचे तीन सदस्य आहेत. या सदस्यांच्या बळावर मेटेंचं आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले होते.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मेटे यांनी जय्यत तयारी केली होती. परंतु पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दुराव्यामुळे विनायक मेटे यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याशी जवळीक साधल्याने मेटे पुरतेच नाराज झाले होते. त्यामुळे काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांच्यावर शिवसंग्रामचे कार्यकर्ते नाराज आहेत, असं सांगत लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या सोबत काम करणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. तिकडे कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगत असतानाच दुसरीकडे मात्र शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य पंकजा मुंडे यांचं नेतृत्व स्वीकारून भाजपात प्रवेश केल्याने विनायक मेटे यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.

याआधी देखील शिवसंग्रामचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विनायक मेटे यांची साथ सोडून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. आता दोन मातब्बर नेते भाजपच्या गळाला लागल्याने विनायक मेटे यांची मोठी गोची झाल्याचे दिसत आहे

‘शिवसंग्राम’वरच कार्यकर्ते नाराज

मित्रपक्ष म्हणून भाजपात काम करत असताना पंकजा मुंडे यांच्यावर कार्यकर्ते नाराज असल्याचा सूर शिवसंग्राम काढला होता. पंकजा यांच्यावर जर कार्यकर्ते नाराज आहेत, तर मग ते पंकजा मुंडे यांचे नेतृत्व कसे काय स्वीकारतील हा मोठा प्रश्न आहे.

शिवसंग्राममधील सध्याची अस्वस्थता आणि एकला चलो रेची भूमिका यामुळे शिवसंग्रामला बीड जिल्ह्यातून घरघर लागली आहे. रक्ताचं पाणी करुन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसंग्रामचे काही वरिष्ठ नेते दुजाभाव करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मेटे यांची मनधरणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी नेते मेटे यांच्या खूपच जवळ असल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र जाणीवपूर्वक दूर केले जाते आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *