Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण ‘हा’ उल्लेख टाळला

| Updated on: Jul 27, 2022 | 12:14 PM

Uddhav Thackeray : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सध्या शिवसेनेच्या वर्चस्वावरून वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तसं पत्रंही दिलं आहे. तसेच धनुष्यबाण आपल्याला मिळावा, अशी मागणीही आयोगाकडे केली आहे.

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण हा उल्लेख टाळला
मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण 'हा' उल्लेख टाळला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कालपासूनच मातोश्रीवर कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. ढोलताशे वाजवत शिवसैनिकांकडून (shivsena) त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा गुच्छ देण्याऐवजी प्रतिज्ञापत्रांची भेट दिली आहे. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकारण, उद्योग जगत, सामाजिक क्षेत्र, बॉलिवूडमधूनही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देताना शिंदे आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला आहे. त्याऐवजी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून अमान्य आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना…, असं शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर, माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

चर्चा तर होणारच

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सध्या शिवसेनेच्या वर्चस्वावरून वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तसं पत्रंही दिलं आहे. तसेच धनुष्यबाण आपल्याला मिळावा, अशी मागणीही आयोगाकडे केली आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. या गटाने एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नेते म्हणून जाहीर केले आहे. दीपक केसरकर यांना पक्षाचे प्रवक्ते केले आहे. तर इतर नेत्यांना उपनेतेपद दिलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे गटात शिवसेनेवरील दाव्यावरून वाद सुरू असतानाच शिंदे आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळल्याने आश्चर्य व्यक्त होत असून राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

 

रामदास कदम मात्र शिवसेना नेते

रामदास कदम यांची शिवसेनेची हकालपट्टी करण्यात आली आहे. कदम यांनीही शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या उल्लेख शिवसेना नेता असा केला आहे.

 

गुलाबराव पाटलांना मान्य

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा शुभेच्छा गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. बंडखोर गटाचे आमदार उदय सामंत यांनीही पक्षप्रमुख उल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला आहे.