
संदीप राजोगळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली: शिंदे गटाने (shinde camp) शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला (election commission) पत्र देऊन एकनाथ शिंदे यांची आम्ही नेता आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड केल्याचं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या या दाव्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. मात्र, शिंदे गटाचा हा दावा शिवसेना सचिव अनिल देसाई (anil desai) यांनी फेटाळून लावला आहे. कोणी कितीही दावा केली तरी पक्षाची आपली घटना असते. त्या घटनेनुसारच काम करावं लागतं. राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंना लोकशाही पद्धतीने निवडून दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच अध्यक्ष आहेत, असं अनिल देसाई यांनी पक्षाच्या घटनेचा पुरावा देत ठणकावून सांगितलं आहे.
अनिल देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना हे स्पष्ट केलं. शिवसेना पक्षाची घटना निवडणूक आयोगाला सादर करायची असते. ती वेळोवेळी आम्ही सादर केली आहे. निवडणूक आयोगाकडे सर्व कागदपत्रे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काम करू शकत नाही, असं अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं.
निवडणूक आयोगाने 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे देण्यास सांगितले होते. त्यानुसार आज आम्ही कागदपत्रे सादर करतोय. शिंदे गटाने सादर केलेले कागदपत्रं आम्हाला मिळाले नाहीत. या प्रक्रियेला वेळ लागतोय. मुदतवाढ देणं हे निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त आहे. यासाठी काही वेळ लागणार आहे. तो वेळ दोघांसाठीही मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगावर भारताची लोकशाही अवलंबून आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आयोगाचा निर्णय महत्त्वाच असेल. 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले.28 सप्टेंबरला निवडणूक आयोगानं दोघांनाही पत्र पाठवले.
अभिप्रेत असलेल्या फॅारमॅटमध्ये माहिती देण्याचे पत्रं निवडणूक आयोगानं पाठवलं होते. जो पर्यंत शिंदे गटाचे तपशील मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही माहिती कशी देणार? अशी विचारणा केली होती, असं त्यांनी सांगितलं.