आधी संभाजीनगरात जबर धक्का, नंतर परभणीत मोठा हादरा, ठाकरेंचा बडा नेता भाजपात, पवारांनाही झळ; मराठवाड्यात चाललंय काय?

छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी या दोन्ही जिल्ह्यांत ठाकरे तसेच शरद पवार यांच्या पक्षाला जबर धक्के बसले आहेत.

आधी संभाजीनगरात जबर धक्का, नंतर परभणीत मोठा हादरा, ठाकरेंचा बडा नेता भाजपात, पवारांनाही झळ; मराठवाड्यात चाललंय काय?
uddhav thackeray and sharad pawar and devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Apr 02, 2025 | 6:34 PM

Maha Vikas Aghadi : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील पक्ष तसेच त्या-त्या पक्षांचे नेतेमंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. कोणत्याही क्षणी या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्ष घेता स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीही आपल्या आपली राजकीय सोय लक्षात घेऊन पक्ष बदल करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होत आहे. छत्रपती संभाजीनगरानंतर आता परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीतील गटकपक्षांना मोठे धक्के आणि हादरे बसत आहेत.

छत्रपती संभाजीनगरात नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना मराठवाड्यात झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजी नगरातील पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम केले आहे. लवकरच ते भाजपात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे तसेच खासदार शरद पवार यांच्या पक्षाला परभणीतूनही मोठा धक्का बसला आहे.

परभणीत नेमकं काय घडलं?

परभणीत स्थानिक पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना भाजपाने धक्का दिला आहे. येथे अनेक उच्चपदस्थ नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या. या पक्षप्रवेश सोहळ्यात ठाकरे गटाच्या माजी जिल्हाध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचं संपूर्ण संचालक मंडळच भाजपात दाखल झालं आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता मराठवाड्यात महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.