अमरावतीचा पराभव शिवसेनेतील गद्दारांमुळे? वाद मिटवण्यासाठी मातोश्रीवर शर्तीचे प्रयत्न

| Updated on: Jul 14, 2019 | 5:40 PM

अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? याबाबत मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

अमरावतीचा पराभव शिवसेनेतील गद्दारांमुळे? वाद मिटवण्यासाठी मातोश्रीवर शर्तीचे प्रयत्न
Follow us on

मुंबई: अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? याबाबत मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी अमरावतीचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकही उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्यांच्यावर गद्दारीचे आरोप झाले ते शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे देखील उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीतील हा वाद मिटवून विधानसभेसाठी तयार होण्याचे शिवसेनेकडून पूर्ण प्रयत्न यावेळी करण्यात आले. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी हा वाद चर्चेअंती मिटला असल्याची माहिती दिली आहे. असे असले तरी सध्या सगळीकडे शिवसेनेतील  गद्दारींचा वाद उफाळल्याचीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे अमरावतीचा वाद मिटला आहे की वाढला आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेतील गद्दारीचा वाद नेमका काय आहे?

शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत शिवसेनेचे स्थानिक नेते अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेकडे यांच्याकडे तक्रारही केली होती.

खासदार नवनीत रवि राणा यांच्या ‘विजय आणि आभार रॅली’मध्ये माजी खासदार अनंतराव गुढे यांच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या होत्या. याचे व्हिडिओ आणि फोटो  देखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले आहेत. यानंतर आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) मातोश्रीवर बैठक बोलावली. या बैठकीला अनंतराव गुढे यांना तातडीनं बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

गद्दारीच्या आरोपांवर अनंत गुढेंचं म्हणणं

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे यांनी गद्दारीच्या आरोपांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी मी माझं म्हणणं पक्षप्रमुखांसमोर मांडलं. शिवसेना माझी आई आहे, तर मातोश्री हे मंदिर आहे. तो व्हिडिओ निवडणुकीपूर्वीचा आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमात हा व्हिडिओ काढला होता.” मातोश्रीवरील बैठकीत गुढे यांनी त्या व्हिडिओने दुखावलेल्या शिवसैनिकांची माफीही मागितली. तसेच आपल्या हकालपट्टीच्या मागणीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असंही गुढे यांनी नमूद केले.

यानंतर शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी हा संघटनात्मक वाद होता आणि तो आता मिटल्याचे सांगितले. दोघांमध्ये संवाद झाला असून हा वाद मिटवण्यासाठी पक्षप्रमुख सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.