Video: नंदुरबारच्या खासदार म्हणतात, जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला !

जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकल्याचा खळबळजनक आरोप खासदार डॉ. हिना गावित यांनी केलाय.

Video: नंदुरबारच्या खासदार म्हणतात, जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला !
नंदूरबारच्या खासदार हिना गावित यांचा रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत गंभीर आरोप
| Updated on: Apr 22, 2021 | 3:45 PM

नंदूरबार : राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. अशावेळी नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी अत्यंत गंभीर आरोप केलाय. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची गरज आहे. असं असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकल्याचा खळबळजनक आरोप गावित यांनी केलाय. गावितांच्या या आरोपामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (MP Heena Gavit’s allegations against Nandurbar District Collector)

जिल्हाधिकारी आणि माजी आमदारावर गंभीर आरोप

“नंदुरबार जिल्हा आणि मतदारसंघात गावोगावी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दवाखान्यांमध्ये आज रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची मोठी गरज भासत आहे. मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा फोन केला की, ताई आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे इंजेक्शन नाही. दवाखान्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली. ज्या प्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरला इंजेक्शन उपलब्ध करुन दिले, तसेच दवाखान्यांनाही हे इंजेक्शन उपलब्ध करुन द्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय़ घेतला नाही. शेवटी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त 500 इंजेक्शन दवाखान्यांना दिले. रोटरी वेलनेस सेंटरला 1 हजार इंजेक्शन देण्यात आले होते. दवाखान्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याचं कळालं. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हे काम केल्याचा” गंभीर आरोपहीना गावित यांनी केलाय.

रेमडेसिव्हीरवरुन राजकारण जोरात

केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यात 21 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पुरवल्या जाणाऱ्या इंडेक्शन्सचा आकडा देण्यात आलाय. यात महाराष्ट्राच्या वाट्याला पहिल्यापेक्षा कमी इंजेक्शन्स येत असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

दिवसाची 50 हजार इंजेक्शन्सची गरज पूर्ण करा – मलिक

देशातील विविध राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीरचे आकडे केंद्र सरकारनं नुकतेच जारी केलेत. महाराष्ट्राची गरज दिवसाला 50 हजार इंजेक्शन्सची आहे. राज्य सरकार सातत्याने तशी मागणी करत आहे. मात्र, आपल्याला सध्या दिवसाला 36 हजार इंजेक्शन्स मिळत आहेत. नव्या निर्णयांमुळे ही संख्या अजून कमी होणार आहे. त्यामुळे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राची स्थिती बिकट होईल, अशी भीती अल्पसंख्याक विकासमंत्री नबाव मलिक यांनी व्यक्त केलीय. तसंच केंद्रानं महाराष्ट्राची दिवसाची 50 हजार इंजेक्शन्सची गरज पूर्ण करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

राष्ट्रवादीचा कृतघ्नपणा आणि राजकारण- भातखळकर

केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिव्हीरचं वाटप करताना राज्यातील सक्रीय रुग्णसंख्येचा विचार केला. त्यानुसार महाराष्ट्राला सर्वाधिक 2 लाख 69 हजार इंजेक्शन्स मिळाले आहेत. खरं तर रेमडेसिव्हीर प्राप्त करणं हे राज्याचं काम. पण तरीदेखील केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक इंजेक्शन्स दिले. अशावेळी केंद्रावर टीका करणे म्हणजे केवळ कृतघ्नपणा आणि राजकारण असल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय.

संबंधित बातम्या : 

Remedesivir For Maharashtra : महाराष्ट्राच्या वाट्याला किती रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स? राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस विकत घ्यायची परवानगी दिली पण महिन्याभराचा साठा अगोदरच बूक केलाय’

MP Heena Gavit’s allegations against Nandurbar District Collector