अबू आझमींच्या सुपुत्राची घोषणा, उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार, “तुम्ही राम मंदिरा बांधा, आम्ही मशीद उभारु”

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते  राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू” असं फरहान आझमी म्हणाले.

अबू आझमींच्या सुपुत्राची घोषणा, उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार, तुम्ही राम मंदिरा बांधा, आम्ही मशीद उभारु
| Updated on: Jan 30, 2020 | 12:32 PM

मुंबई : ठाकरे सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्या मुलाने मोठं विधान केलं आहे. अबू आझमींचे सुपुत्र फरहान आझमी (Farhan Azmi on Ayodhya Babri Masjid) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू” असं फरहान आझमी म्हणाले.  इतकंच नाही तर ठाकरे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही, असंही फरहान आझमी म्हणाले. (Farhan Azmi on Ayodhya Babri Masjid)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार (Uddhav thackeray ayodhya) आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा केली. 7 मार्चला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या घोषणेनंतर फरहान आझमी यांनीही आपण अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे.

फरहान आझमी म्हणाले, “मी इशारा देतो, याला धमकी समजा किंवा काहीही समजा, पण मला विनम्रपणे सांगायचं आहे की, जर उद्धव ठाकरेजी जर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून म्हणत असतील की 7 मार्चला आपण अयोध्येला जाणार, तर मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार. मी जाणारच, शिवाय माझ्या वडिलांनाही सोबत येण्याची विनंती करणार, सपाच्या आमदारांनाही घेऊन जाणार. शिवाय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना निमंत्रण देऊ इच्छितो की जर उद्धव ठाकरेजींनी अयोध्येचं तिकीट काढलं, तर आम्ही इकडून पायी अयोध्येसाठी जाऊ. आम्ही सर्वजण सोबत जाऊ. मात्र एक अट असेल, ते राम मंदिराची निर्मिती करतील, आम्ही बाबरी मशीद बांधू”

“आता हा मुद्दा पुन्हा बाहेर का काढला जात आहे? तुम्ही लोकांना धोका दिला. मोदींच्या नावे मतं मिळवली. अमित शाहांच्या भीतीने काँग्रेस-राष्ट्रवादीला रिकामं केलं आणि त्यांनाच तिकीट देऊन तुम्ही सरकार चालवत आहात. आम्ही त्याचं खंडण करतो. अयोध्या दौरा करुन तुम्ही मुस्लिम, दलित, अल्पसंख्याक, भारतीय आणि धर्मनिरपेक्ष हिंदूंना धमकावत आहात. शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. आम्हाला विश्वास नाही की हे सरकार 6-8 महिन्यांपेक्षा जास्त चालेल”, असं फरहान आझमी म्हणाले.