मोठी बातमी : 100 देशांच्या राजदूतांची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द

जगभरातील विविध 100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट अचानक रद्द झाली आहे. प्रशासनाकडून तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 19:59 PM, 27 Nov 2020

पुणे : जगभरातील विविध 100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट अचानक रद्द झाली आहे. प्रशासनाकडून तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. असं असलं तरी पंतप्रधान मोदी स्वतः सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. यावेळी सर्व राजदूत कोरोना लसीसंदर्भात आढावा घेणार होते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी संबंधित राजदूतांचा हा महत्त्वाचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (28 नोव्हेंबर) सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत (Serum institute visit of 100 countries Ambassadors canceled).

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत. तर दुसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची लस डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा सीरमच्या आदर पुनावाला यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. मात्र आता ही भेट रद्द झाली आहे. आता मोदी एकटेच सीरमला भेट देतील.

दरम्यान, याआधी 100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होणार होते. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला होता. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली होती.

सीरम इन्स्टिट्यूट भारतात डिसेंबरपर्यंत 10 कोटी डोस पुरवणार

संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीवर मोठ्या वेगाने काम सुरू आहे. यातच पुण्यातल्या कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर असं झालं तर कोरोनाचा संसर्ग संपवण्यात भारताला मोठं यश येईल.

सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चाचण्या समाधानकारक असल्याची माहितीही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात आली आहे. या चाचण्यांचे निकाल चांगले आले असून आता लस रुग्णांच्या वापरासाठी तयार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे.

‘सिरम’ची कोरोना लस 225 रुपयांना!

सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.

संबंधित बातम्या:

Corona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार

कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारचं मेगा प्लॅनिंग, सिरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना कंपनीशी संपर्क

Serum institute visit of 100 countries Ambassadors canceled