साडेसाती, अडीचकी असणाऱ्यांना शनिदेवांकडून 6 मार्चपर्यंत ढील! ग्रह अस्ताला जाणं म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घ्या

| Updated on: Feb 03, 2023 | 8:30 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह अस्ताला गेल्यानंतर बळहीन होतो. त्यामुळे काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक बदल दिसून येतो. 6 मार्चपर्यंत शनि ग्रह अस्ताला असणार आहे.

साडेसाती, अडीचकी असणाऱ्यांना शनिदेवांकडून 6 मार्चपर्यंत ढील! ग्रह अस्ताला जाणं म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घ्या
शनिदेव कुंभ राशीत 6 मार्चपर्यंत अस्ताला असणार आहे.
Follow us on
मुंबई: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. नवग्रहातील प्रत्येक ग्रह आपल्या स्वभाव आणि गतीनुसार फळ देत असतो. त्यामुळे गोचर कुंडली आणि वैयक्तिक कुंडलीत ग्रहांची स्थिती काय आहे? याकडे जातकांचं लक्ष लागून राहातं. ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांना शुभ, तर काही ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं जातं. शनिदेव न्यायदेवता असले तरी ज्योतिषशास्त्रात त्यांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. कुंडलीत शनिची स्थिती कुठे आणि कशी आहे यावरून भाकीत वर्तवलं जातं. गोचर कुंडलीनुसार 12 राशींच्या नशिबाला साडेसाती आणि अडीचकी प्रभाव सहन करावा लागतो. तर वैयक्तिक कुंडलीत शनिची स्थिती काय आहे? यावरून फलश्रूती ठरत असते. नवग्रहांमध्ये शनि सर्वात मंदगतीने भ्रमण करणारा ग्रह आहे. जर जातकाच्या कुंडलीत शनि योग्य ठिकाणी बसला असेल तर सुख-समृद्धी प्राप्त होते. 17 जानेवारीला शनिदेवांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. त्यामुळे मकर राशीला शेवटची अडीच वर्षे, कुंभ राशीला मधली अडीच वर्षे आणि मीन राशीला पहिली अडीच वर्षे सुरु झाली आहेत. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. असं असताना 30 जानेवारीपासून शनिदेव अस्ताला गेले आहेत. 6 मार्चपर्यंत शनिदेव अशा स्थितीत असणार आहे. अशा स्थितीत शनिची साडेसाती आणि अडीचकी सुरु असणाऱ्या काही राशींना ढील, तर काही राशींना सावध राहावं लागणार आहे.

ग्रह अस्त होणे म्हणजे नेमकं काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळाचे सूर्यदेव राजे आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली ग्रहमंडळाचं कार्य सुरु असतं. सूर्यदेवांचं तेज पृथ्वीतलावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कक्षेत फिरणाऱ्या ग्रहांना अनुभव घ्यावा लागतो. कोणताही ग्रहाचं सूर्याच्या जवळ आल्यानंतर त्याचं बळ कमी होतं. अस्ताला गेलेल्या ग्रहाची स्थिती एका अस्वस्थ आणि बळहीन राजासारखी असते. त्याच्याकडे सर्वकाही असतं मात्र योग्य निर्णय घेण्यास अक्षम असतो.

कोणता ग्रह कसा अस्ताला जातो?

ग्रहमंडळात सूर्यदेव कधीही अस्थाला जात नाही. तसेच राहु आणि केतु छायाग्रह असल्याने अस्ताला जात नाही. दुसरीकडे चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि सुर्यापासून ठरावीक अंतरावर आल्यावर अस्त पावतात. चंद्र सूर्यापासून 12 अंश, मंगळ 7 अंश, बुध 13 अंश, गुरु 11 अंश, शुक्र 10 अंशात आल्यावर अस्ताला जातो.

शनि अस्ताला गेल्याने कोणत्या राशींनी घ्यावी काळजी?

मेष- या राशीच्या दहाव्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे. या राशीत शनिदेव अकराव्या स्थानात अस्ताला गेला आहे. हे स्थान आर्थिक आणि इच्छाशक्तिशी संदर्भित आहे. त्यामुळे या काळात आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागू शकतं.
मिथुन- या राशीची अडीचकी संपली असली तरी शनिदेव या राशीच्या अष्टम आणि नवम भावाचा स्वामी आहे. अस्ताला गेलेला शनिदेव नवव्या स्थानात आहे. नववं स्थान भाग्योदयाचं स्थान असतं. त्यामुळे 6 मार्चपर्यंतचा काळ अडचणीचा असणार आहे.
तूळ- या राशीच्या चतुर्थ आणि पंचम स्थानाचा स्वामी आहे. नुकतीच अडीचकी संपल्यानंतर शनिदेव पाचव्या स्थानात गोचर करत आहे. हे स्थान प्रेमसंबध, संतान, शिक्षणाशी संबंधित आहे. या काळात तणाव आणि नकारात्मक उर्जेचा सामना करावा लागू शकतो.
मीन- मीन राशीच्या अकरा आणि बाराव्या स्थानाचा स्वामी शनि आहे. या राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. बाराव्या स्थानात शनि अस्ताला गेल्याने या काळात खर्च वाढणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. तसेच कर्ज घेणं अस्त काळात टाळा.