
दिवाळीचा सण जवळ येताच प्रत्येक घरात खरेदीच्या आधी सुरु होते दिवाळीची साफसफाई. दिवाळीपूर्वी घर स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. हे वर्षानुवर्ष सुरु आहे. याची दोन कारणं म्हणजे सणासाठी घराची स्वच्छता, तसेच घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील ही साफसफाई महत्त्वाची असते. पण असे मानले जाते की जेव्हा आपण स्वच्छता करताना वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरातील बॉक्स किंवा डबेही स्वच्छ करतो. कपाट स्वच्छ करतो. किंवा घरातील प्रत्येक वस्तूंची साफसफाई करतो. त्यावेळी अशा काही वस्तू आहेत जर त्या सापडल्या तर नक्कीच त्या आपल्यासाठी शुभ ठरतात. संपत्ती आणि समृद्धीचे संकेत त्यातून मिळतात. जाणून घेऊयात त्या चार वस्तू कोणत्या.
अचानक पैसे सापडणे किंवा नाणे सापडणे : दिवाळी साफसफाई करताना तुम्हाला अचानक जुन्या पेटीत, एखद्या पर्समध्ये किंवा ड्रॉवरमध्ये जुने पैसे किंवा नाणी सापडली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. हे सूचित करते की तुमचे आर्थिक व्यवहार लवकरच सुटतील आणि तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. ते पैसे शक्यतो खर्च न करता स्वच्छ पुसून मंदिरात ठेवा तसेच त्यातील काही पैसे हे लाल कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात सुरक्षित ठेवा. असे केल्याने संपत्ती वाढते असे म्हटले जाते.
छोटा शंख किंवा कवडी सापडणे : शंख आणि कवडी दोन्ही समुद्रमंथनाशी संबंधित आहेत आणि देवी लक्ष्मीला प्रिय देखील. शंख हे भगवान विष्णूंचे आवडते वाद्य आहे आणि कवडी हे देवी लक्ष्मीचे आवडते आहे. प्राचीन काळी कवडी चलन म्हणून वापरली जात होती आणि ती देवीचे प्रतीक मानली जाते. साफसफाई करताना जर तुम्हाला शंख किंवा कवडी सापडली तर ते तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा असल्याचे संकेत असतात. सापडलेली शंख किंवा कवडी गंगाजलाने शुद्ध करा, ते तुमच्या पूजास्थळावर ठेवा आणि दिवाळीला त्याची पूजा करा.
मोराचे पंख सापडणे : हिंदू धर्मात मोराचे पंख खूप पवित्र आणि शुभ मानले जातात. ते भगवान श्रीकृष्णाचे आवडते आहेत आणि ते विद्येची देवी सरस्वतीशी देखील संबंधित आहेत. मोराचे पंख सापडणे हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे आणि सकारात्मकता येण्याचे स्पष्ट लक्षण आहे. मोराचे पंख शोधणे हे सूचित करते की तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होत आहेत. सापडलेले मोराचे पंख एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा, जसे की मंदिर.
लाल वस्त्र किंवा चुनरी सापडणे : साफसफाई करताना एखाद्या बॉक्समध्ये किंवा ड्रॉव्हरमध्ये वैगरे मंदिरात आत वापरायचे एखादे लाल रंगाचे कापड, लाल चुनरी सापडणे अत्यंत शुभ मानले जाते. लाल रंगाचे कापड सापडणे हे देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील याचे लक्षण मानले जाते. ते तुमच्या वैवाहिक जीवनात शुभेच्छा आणि गोडवा देखील आणते. हे कापड तुमच्या घरातील मंदिरात किंवा तिजोरीत ठेऊ शकता. आणि खूपच जीर्ण झालं असेल तर ते कोणत्याही स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात सोडून द्या.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)