साता समुद्रापलिकडे विठुनामाचा गजर! दुबईत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा

Dubai Ashadhi Ekadashi : दुबईत श्री गणेश भजन मंडळातर्फे आषाढी एकादषीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक विठ्ठल भक्तांनी एकत्र येत या सोहळ्याला हजेरी लावली.

साता समुद्रापलिकडे विठुनामाचा गजर! दुबईत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा
Dubai Aashadi Ekadashi
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 8:23 PM

संपूर्ण राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. आषाढी एकादशीचा हा सोहळा केवळ राज्यात नव्हे तर साता समुद्रापलिकडेदेखील साजरा करण्यात आला. दुबईत श्री गणेश भजन मंडळातर्फे आषाढी एकादषीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक विठ्ठल भक्तांनी एकत्र येत या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अनेजण वारकरी वेषभूषेतही पहायला मिळाले. या सोहळ्यानंतर श्री गणेश भजन मंडळाने उपस्थितांचे आभार मानले आहे.

श्री गणेश भजन मंडळाने आभार मानताना म्हटले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश भजन मंडळातर्फे आयोजित अकराव्या आषाढी एकादशी सोहळ्याला आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि संपूर्ण कार्यक्रमात केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल श्री गणेश भजन मंडळ आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.

खरं तर “आभार” हा शब्दही अपुरा आहे; कारण आपण सर्वांनी दाखवलेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि दिलेली साथ यामुळे आम्ही आपले कायमचे ऋणी आहोत. गेली अकरा वर्षे आपण मंडळावर जो विश्वास दाखवत आहात, त्यातूनच आम्हाला दरवर्षी नव्या जोमाने, नव्या उत्साहाने विठूमाऊलीची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या प्रत्येकाच्या सहकार्यामुळेच हा सोहळा आज इतक्या मोठ्या भक्तीमय उत्सवात रूपांतरित झाला आहे.

आज मागे वळून पाहताना मन भरून येते. अकरा वर्षांपूर्वी जेव्हा हा छोटासा उपक्रम सुरू केला, तेव्हा कधीच कल्पना नव्हती की एक दिवस इतके भाविक प्रेमाने, श्रद्धेने आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होतील. आज आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद पाहून असे वाटते की हा कार्यक्रम केवळ मंडळाचा राहिलेला नाही, तर तो आपल्या सर्वांचा सामूहिक भक्तीचा उत्सव बनला आहे.

आपले प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम आमच्या पाठीशी राहू दे. यापुढेही अधिक भक्तिभावाने, अधिक चांगल्या प्रकारे विठ्ठल-रुक्मिणीची सेवा करण्याचे बळ आम्हाला मिळत राहो, हीच श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! रामकृष्ण हरी!

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us