Pune Graduate Election: खंडणीखोर लोकांना बाजूला… शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा बॉम्ब, पुणे पदवीधर निकालावरून ओढला चाप, युतीत मीठाचा खडा पडणार?
Pune Graduate Election Result 2026: पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहेत. तर शिक्षक मतदारसंघात पक्षाकडे पारडं झुकताना दिसत आहे. दरम्यान शिंदे सेनेच्या बड्या नेत्याने या सर्व घडामोडींवर मोठे वक्तव्य केलं आहे.

Ravindra Dhangekar Reaction: पुणे पदवीधर निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानल्या जात आहे. कोटा पूर्ण होण्यासाठी त्यांना अवघी काही मतं लागणार आहे. तर शिक्षक मतदारसंघात भाजप पक्षाच्या बाजूने पारडे झुकताना दिसत आहे. पुण्यात महायुतीमधील बंडाळी समोर आली होती. शिक्षक मतदारसंघात तर शिंदेसेनेने थेट सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला होता. पदवीधरमध्ये भाजपकडून डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. या सर्व घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी खरपूस प्रतिक्रिया दिली आहे.
खंडणीखोर लोकांना बाजूला ठेवलं पाहिजे
पुणे पदवीधर मतदारसंघा मध्ये माझ्या जवळचे सहकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख निवडून येण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदार संघातील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानेल. आपण खंडणीखोर लोकांना या व्यवस्थेपासून बाजूला ठेवलं पाहिजे. आपण कोणाला मतदान करतोय याचं भान सर्वांना राहिलं पाहिजे. मी आव्हान केलं होतं आणि त्याला प्रतिसाद पदवीधरांनी दिला आहे. चांगलं वाईट पदवीधरांना कळत आहे, असे मोठे वक्तव्य आणि गौप्यस्फोट धंगेकर यांनी केला.
मतदारांनी चपराक दिली
हर्षदा देशमुख 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मी तर पहिलंच अभिनंदन केलेलं आहे. एक चांगली कर्तुत्वान बापाची मुलगी स्वाभिमानी काम करणारी कार्यकर्ती आम्ही तिला बघत आहोत. खंडणीखोरांना तिकीट द्यायची परत समाजामध्ये पांढरा चष्मा घालून फिरायचं. अशी परिस्थिती काही लोकांनी निर्माण केली होती त्यांना मतदारांनी चपराक दिली, असे धंगेकर म्हणाले. त्यांनी एकूणच या प्रक्रियेवर मोठे भाष्य केले.
शिक्षक मतदारसंघात लक्ष्मी दर्शन
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन जास्त झालेले दिसतंय. यापूर्वी निवडणुकीमध्ये जास्त अर्थकारण कधी आलं नाही. शिक्षक पण स्वाभिमानी पण मतदानामध्ये कसं काय झुकला हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच व्हावा अशी प्रमाणिक भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची होती. शिक्षकांमधली काही लोक पैसे घेताना दिसली याचं वाईट वाटलं. लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम शिक्षकांनी करायला पाहिजे होतं. पण जास्त लक्ष्मी दर्शन झालेल्या दिसतंय. कमीत कमी शिक्षकांकडून तरी अशी अपेक्षा नव्हती, असा जबरी टोलाही रविंद्र धंगेकर यांनी लगावला.
या पापाला क्षमा नाही
त्यामध्ये व्यवहार पारदर्शक आहे का तर अजिबात नाही हे अभयारण्य कोणाला दिला आहे हे शोधणं गरजेचं आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर ते पाप आहे. जर पाप केलं असेल तर या पापाला क्षमा नाही. विकासाच्या नावाखाली अभयारण्य भस्म केल्या जात असेल तर हे चुकीच आहे. त्यांना पुढील सातपिढ्या माफ केला जाणार नाही, असे वक्तव्य धंगेकरांनी कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीवरून केले.
