Chanakya Niti : या चार गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर वेळीच सावध व्हा, असतात घरात गरिबी येण्याचे संकेत
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने आपल्या आयुष्यात आर्थिक शिस्त कशी आणावी? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला गरीबीचे संकेत देतात.

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात आर्थिक घडी कशी बसवावी? आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आर्थिक शिस्त कशी आणावी? पैशांची बचत कुठे करावी आणि पैसा कुठे खर्च करावा? पैशांची गुंतवणूक कशी करावी? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शकाचं काम करतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात पैशाला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर अनेक संकट येण्यापूर्वीच नष्ट होतात. त्यामुळे प्रत्येक माणसाने पैशांची बचत केलीच पाहिजे, जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर त्यातील 25 रुपयांची तुम्ही बचत करायला हवी, कारण संकट काळात हाच पैसा तुमच्या उपयोगाला येणार आहे. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही विशिष्ट गोष्टी घडताना दिसल्या तर ते घरात गरिबी येण्याचे संकते असू शकतात, त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
खर्चात वाढ – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा खर्चा हा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त वाढतो, तेव्हा तुम्ही सावध झालं पाहिजे. कारण जर तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल तर त्यामुळे तुमच्याकडे बचत शिल्लक राहणार नाही. हातात पैसे उरणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. त्यामुळे जेव्हा खर्च वाढतो, तेव्हा तु्म्ही पैशांचं योग्य पद्धतीने नियोजन करणं अपेक्षित आहे.
घरात सतत भांडणं – चाणक्य म्हणतात ज्या घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. घरातील सदस्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम नाही, अशा घरात कधीही लक्ष्मी टिकत नाही. त्यामुळे घर शांत ठेवा, घरात विनाकारण होणारे वाद टाळा, यामुळे घरात पैसा येईल, सुख शांती समृद्धी येईल.
अनावश्यक गोष्टींवर खर्च – चाणक्य म्हणतात आपल्याला आपलं जीवन आरामात जगता यावं, यासाठीच आपण पैसा कमावत असतो. परंतु आपण आपल्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. अनेक जण मोठेपणा दाखवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज नाही, अशा गोष्टींवर देखील पैसा खर्च करतात. जेव्हा अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होतो, तेव्हा तुमचं आर्थिक नियोजन कोलमडतं.
मोठ्यांचा आदर – चाणक्य म्हणतात आपण नेहमी आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचं म्हणंण ऐकून घेतलं पाहिजे. कारण त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा खूप जास्त असतो. जेव्हा आपण अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची देखील शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)