Chanakya Niti: आयुष्यात ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना मदत करताना दहा वेळा विचार करा! अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या विचारांनी आजही आपल्याला खूप मदत होऊ शक्ये. चाणक्य नीतीनुसार, इतरांना मदत करणे हा एक उदात्त गुण आहे. परंतु, नीट विचार न करता केलेली मदत स्वतःच्या आयुष्यात संकट ओढवून घेऊ शकते.

भारतीय संस्कृतीत परोपकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसऱ्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या मदतीला धावून जाणे हा माणुसकीचा खरा धर्म मानला जातो. मात्र, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक व्यक्तीला मदत करणे योग्य असतेच असे नाही. कारण काही वेळा आपली चांगली भावना आणि मदत करण्याची वृत्तीच आपल्यासाठी अडचणीचे कारण ठरू शकते. महान अर्थतज्ज्ञ आणि राजनीतीज्ञ आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीसूत्रांमधून मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडले आहेत.
चाणक्य नीतीच्या विचारांशी जोडल्या जाणाऱ्या अशाच पाच प्रकारच्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया, ज्यांना मदत करताना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
१. मूर्ख आणि हट्टी स्वभावाचे लोक
जे लोक कोणाचेही ऐकून घेण्यास तयार नसतात आणि स्वतःची चूक असूनही ती मान्य करत नाहीत, त्यांना समजावण्याचा प्रयत्न अनेकदा निष्फळ ठरतो. अशा व्यक्तींना कितीही चांगला सल्ला दिला, तरी त्या स्वतःच्याच विचारांवर ठाम राहतात. त्यामुळे यांच्यामागे आपला वेळ घालवू नकात.
२. दुष्ट आणि स्वार्थी वृत्तीचे लोक
काही लोक प्रत्येक नात्याकडे केवळ स्वतःचा फायदा मिळवण्याच्या दृष्टीने पाहतात. त्यांच्यासाठी दुसऱ्यांच्या भावना, विश्वास किंवा उपकारांना फारसे महत्त्व नसते. गरज असेपर्यंत ते आपल्याशी गोड बोलतात. मात्र स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर तेच लोक आपल्याविरुद्ध उभे राहू शकतात. अशा लोकांनाही कधीही मदत करू नकात.
३. चुकीच्या मार्गाला प्रोत्साहन देणारे लोक
एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गावर जात असेल, तर तिला योग्य दिशा दाखवणे नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र, गुन्हेगारी कृत्ये, व्यसनाधीनता किंवा अनैतिक कामांना आपला पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
४. उपकार विसरणारे लोक
काही व्यक्तींना गरज असताना आपली आठवण येते. मात्र त्यांची अडचण दूर झाल्यानंतर ते आपल्याकडे पाठ फिरवतात. मदत मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे तर दूरच, वेळ पडल्यास तेच लोक आपल्याला ओळखत नसल्यासारखे वागतात. अशा व्यक्तींना वारंवार मदत केल्यास आपल्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
५. अहंकारी आणि गर्विष्ठ लोक
ज्या व्यक्तींना स्वतःची चूक मान्य करणे कमीपणाचे वाटते, त्यांना योग्य सल्ला देणे कठीण असते. अशा लोकांना दुसऱ्यांचे मार्गदर्शन किंवा मदत स्वीकारण्याऐवजी स्वतःचेच मत योग्य वाटते. त्यांच्या भल्यासाठी केलेला प्रयत्नही त्यांना अपमानासारखा वाटू शकतो. त्यामुळे समोरची व्यक्ती बदलण्यास तयार नसेल, तर विनाकारण स्वतःची ऊर्जा खर्च करण्यात अर्थ नाही.
(disclaimer: वरील लेखातील विचार चाणक्य नीतीशी संबंधित पारंपरिक शिकवणींवर आधारित आहेत. या विचारांची मूळ ग्रंथातील अचूक मांडणी किंवा संदर्भ स्वतंत्रपणे पडताळलेले नाहीत. याची पुष्टी TV9 Marathi करत नाही.)