Vinayaka Chaturthi 2022 :विनायक चतुर्थी कोणत्या दिवशी आहे, यादिवसाचे महत्त्व काय, पूजा विधी आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या

चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. यंदा ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, 3 जून रोजी आली आहे. हे व्रत जीवनातील सर्व संकटे दूर करणारे मानले जाते. जाणून घ्या यादिवसाशी संबंधित संपूर्ण महत्त्वाची माहिती.

Vinayaka Chaturthi 2022 :विनायक चतुर्थी कोणत्या दिवशी आहे, यादिवसाचे महत्त्व काय, पूजा विधी आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या
श्री गणेश
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 1:35 PM

चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. ही तिथी गणेशाला (Ganesha) समर्पित मानली जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti chaturthi) आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi 2022) म्हणतात. आज ज्येष्ठ महिन्याची अमावस्या संपली असून, यासोबतच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची सुरुवात झाली आहे.त्यानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, 3 जून रोजी येईल. चतुर्थीचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते. येथे जाणून घ्या विनायक चतुर्थीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गुरूवार, 02 जून रोजी दुपारी 12.17 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 3 जून रोजी दुपारी 2:41 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मातील बहुतेक सण उदय तिथीनुसार साजरे केले जात असल्याने, विनायक चतुर्थी व्रत देखील 3 जून रोजी पाळला जाईल.

विनायक चतुर्थी पूजा पद्धत

सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून हिरवे किंवा पिवळे कपडे घाला. पूजास्थान स्वच्छ करून श्रीगणेशाचे ध्यान करा. गणपतीच्या मंदिरात दिवा लावावा. गणेशाला दुर्वा फुल, हळदी कुंकू, अक्षता, फुलं, लाडू, मोदक, उदबत्ती, दिवा इत्यादी अर्पण करा. दुर्वा अर्पण करा. यानंतर गणपतीच्या मंत्रांचा जप करावा आणि विनायक चतुर्थी व्रत कथा वाचावी. त्यानंतर आरती करावी. दिवसभर उपवास ठेवावा. रात्री चंद्र दिसल्यानंतर, चंद्रदर्शन करून उपवास सोडावा.

विनायक चतुर्थीचे महत्त्व

श्री गणेशाची शक्ती, बुद्धी आणि समृद्धीची देवता म्हणून पूजा केली जाते. चतुर्थीचे व्रत गणपतीला अतिशय प्रिय आहे, असे मानले जाते. जो कोणी हे व्रत पूर्ण भक्तिभावाने करतो त्याच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. त्याव्यक्तीच्या कामात येणारे अडथळे दूर होतात, व्यक्तीला चांगली बुद्धी मिळते आणि घरात सुख-समृद्धी येते. शास्त्रात या व्रताचे वर्णन सर्व संकटांना दूर करणारे असे केले आहे.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)