वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, मिळेल श्रीविष्णूचा आशीर्वाद

दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते. महाकाल नगरी असलेल्या उज्जैनमध्ये हा दिवस भगवान विष्णू आणि महादेव यांचे मिलन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर या शुभ दिवशी श्री विष्णूचा आशीर्वाद मिळावण्यासाठी तुम्ही हे खास उपाय करा.

वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करा हे उपाय,  मिळेल श्रीविष्णूचा आशीर्वाद
वैकुंठ चतुर्दशी
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Nov 03, 2025 | 2:08 PM

वैकुंठ चतुर्दशी प्रामुख्याने कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी ही चतुर्दशी 4 नोव्हेंबर रोजी साजरा केली जाणार आहे. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूने त्यांचे देवता भगवान शिव यांना एक हजार कमळ अर्पण केले आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना सुदर्शन चक्र बहाल केले. तसेच हिंदू धार्मिक श्रद्धांमध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या विशेष दिवशी तुम्ही काही उपाय केल्यास तुम्हाला भगवान विष्णू तसेच महादेव यांचे आशीर्वाद मिळू शकतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात वैकुंठ चतुर्दशीला कोणते उपाय करावे.

मिळेल आनंद आणि समृद्धी 

वैकुंठ चतुर्दशीला सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर पाण्यात गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचा अभिषेक करा आणि विधीवत पुजा करा. याव्यतिरिक्त या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने शुभ परिणाम मिळू शकतात.

हे काम नक्की करा

वैकुंठ चतुर्दशीला तुमच्या घरातील देवघरात तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास, भगवान विष्णूला 1 हजार कमळाची फुले अर्पण करा. तसेच या दिवशी ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा किमान 1 हजार वेळा जप करा. या उपायामुळे तुम्हाला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळू शकते.

प्रगतीचे मार्ग होतील खुले

वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूंना बेलाची पाने आणि भगवान शिवांना तुळशीची पाने अर्पण केली जातात. तर तुम्हीही या दिवशी भगवान विष्णु यांना बेलाची पाने आणि महादेव यांना तुळशीचे पानं नक्कीच अर्पण करा. यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.

भगवान विष्णू आणि महादेव यांचा मिळेल आशीर्वाद

वैकुंठ चतुर्दशीला उपवास करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर यादिवशी संध्याकाळी तुमच्या आसपासच्या नदीकाठी जाऊन 14 दिवे लावणे हा देखील भगवान विष्णू आणि महादेव यांचे आशीर्वाद मिळविण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)