
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली आहे. यावेळी या मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्तही उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते पहिल्या मानाचा कसबा गणपतीची आरती करून मिरवणूक सुरू झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती आता बेलबाग चौकात दाखल झाला आहे.

पुण्यातील मंडई चौकापासून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. गणपती मिरवणुकीसाठी मंडई चौकात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे.

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी वनाझ ते पुणे महापालिका असा पुणे मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेतेही होते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांना चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केलं. तर राज्यात सर्वत्र पाऊस पडू दे. बळीराजा सुखी होई दे... देशात सर्वत्र शांतता नांदू दे. सर्वांना सुखी ठेव, असं साकडं चंद्रकांत पाटील यांनी बाप्पाकडे घातलं.

दहा दिवसांच्या गणेशोत्सवामुळे शहरात आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरण होतं. आजच्या गणेश विसर्जनाची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.