हिंदू कॅलेंडरमधील 12 महिन्यांची नावे कशी निवडली गेली? यामागे दडलेलं आहे खगोलशास्त्र!
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिना संपला असून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. चैत्रापासून फाल्गुनापर्यंतच्या हिंदू कॅलेंडरमधील या १२ महिन्यांची नावे नेमक्या कोणत्या आधारावर ठेवली गेली आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

सनातन धर्मासाठी हिंदू कॅलेंडर फार महत्त्वाचे आहे. कारण यानुसारचं हिंदू सण आणि इतर उपवास, तिथी पाळल्या जातात. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणेच, हिंदू पंचांगातही १२ महिने असतात आणि प्रत्येक महिन्यात ३० दिवस असतात. मात्र, हिंदू पंचांगात प्रत्येक महिन्याचे दोन १५ दिवसांच्या भागांत विभाजन केलेले असते, ज्यांना ‘कृष्ण पक्ष’ आणि ‘शुक्ल पक्ष’ असे म्हणतात. या १२ महिन्यांची नावे योगायोगाने ठेवलेली नाहीत; त्यामागे खगोलशास्त्राचा आधार आहे.
नक्षत्रावरून ठेवलेली नाव
हिंदू कॅलेंडरमधील सर्व 12 महिन्यांची नावे नक्षत्रांच्या नावांवरून घेतली गेली आहेत.
1. चैत्र महिना : ‘चित्रा’ नक्षत्र
2. वैशाख महिना : ‘विशाखा’ नक्षत्र
3. ज्येष्ठ महिना : ‘ज्येष्ठ’ नक्षत्र
4. आषाढ महिना: ‘पूर्वाषाध’ किंवा ‘उत्तराषाधा’ नक्षत्र
5. श्रावण महिना : ‘श्रावण’ नक्षत्र
6. भाद्रपद महिना: ‘पूर्वाभाद्रपद’ किंवा ‘उत्तरभाद्रपद’ नक्षत्र
7. अश्विन महिना: ‘अश्विनी’ नक्षत्र
8. कार्तिक महिना: ‘कृत्तिका’ नक्षत्र
9. मार्गशीर्ष महिना : ‘मृगशिरा’ नक्षत्र
10. पौष महिना: ‘पुष्य’ नक्षत्र
11. माघ महिना : ‘माघा’ नक्षत्र
12. फाल्गुन महिना: ‘पूर्वाफाल्गुनी’ किंवा ‘उत्तराफाल्गुनी’ नक्षत्र
पौर्णिमा आणि नक्षत्रांचा खास संबंध
प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आकाशातील चंद्राच्या मार्गाचे २७ नक्षत्रांमध्ये विभाजन केले होते. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना दररोज वेगवेगळ्या नक्षत्रांच्या जवळून जाताना दिसतो. याच निरीक्षणांचा उपयोग करून भारतीय पंचांगाची रचना करण्यात आली. चांद्र पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राच्या आसपास असतो, त्या नक्षत्रावरून संबंधित महिन्याचे नाव ठरते. उदाहरणार्थ, मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र मृगशीर्ष नक्षत्राजवळ असतो. त्यामुळे या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव पडले.
याच पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची नक्षत्रातील स्थिती लक्षात घेऊन बारा चांद्र महिन्यांची नावे आणि त्यांचा क्रम निश्चित झाला. म्हणजेच, आपल्या पारंपरिक महिन्यांच्या नावांमागे केवळ धार्मिक परंपरा नसून आकाशाचे बारकाईने केलेले निरीक्षण आणि खगोलशास्त्रीय विचारही आहे.
ऋषींचे आकाश निरीक्षण आणि पंचांग निर्मिती
आजच्या काळात चंद्राची स्थिती, त्याचे नक्षत्र आणि खगोलीय बदल जाणून घेण्यासाठी आधुनिक दुर्बिणी, उपग्रह आणि संगणकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र, प्राचीन काळात अशी कोणतीही आधुनिक साधने नव्हती. तरीही तत्कालीन ऋषी आणि खगोल अभ्यासकांनी आकाशाचे सातत्याने निरीक्षण करून चंद्राच्या गतीचा अभ्यास केला. चंद्र कोणत्या नक्षत्राजवळ आहे, पौर्णिमा कधी येते आणि आकाशातील बदल कसे घडतात, याची नोंद ठेवून त्यांनी कालगणनेची पद्धत विकसित केली.
या निरीक्षणांच्या आधारे केवळ महिन्यांची नावेच निश्चित झाली नाहीत, तर ऋतूंचे चक्र, सण-उत्सवांच्या तारखा आणि विविध धार्मिक विधींचे मुहूर्त ठरवण्यासाठीही पंचांगाचा उपयोग होऊ लागला.
विशेष म्हणजे, हजारो वर्षांपूर्वी आकाशाकडे पाहून केलेल्या या निरीक्षणांमधून भारतीय खगोलशास्त्राची समृद्ध परंपरा कशी विकसित झाली, याचीही कल्पना येते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती खगोलशास्त्रीय गणना, पंचांग आणि सर्वसाधारण समजुतींवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)
