
मुंबई : पितृ पंधरवडा संपत नाही तोच नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर दसरा आणि मग कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. हिंदू धर्मशास्त्रात कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं गेलं. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीतलावर वास असतो असं सांगितलं जातं. तर चंद्रापासून निघणाऱ्या शीतल किरणोत्सर्गामुळे त्याचं महत्त्व आणखी अधोरेखित होतं. कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी पडत आहे. पण या दिवशी चंद्रग्रहण असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तसेच हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याने सूतक कालही मान्य आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला छतावर खीर ठेवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात या बाबत..
हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्र 16 कलांनी पूर्ण असतो. या दिवशी चंद्राची पूजा करण्यासाठी खुल्या आकाशाखाली खीर ठेवली जाते. यावेळी आकाशातून अमृत वर्षाव होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे पूजा पाठ करण्यासोबर खीर ठेवणं शुभ मानलं जातं. देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते असं सांगितलं जातं. तसेच भगवान विष्णुंची पूजा केल्यास चांगली फळं मिळतात.
हिंदू पंचांगानुसार कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी सुरु होईल. तर तिथी 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 1 वाजून 53 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे उदय तिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबरला असणार आहे. पण याच दिवशी वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आरहे. ग्रहण 29 ऑक्टोबरला रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरु होईल. ग्रहण मोक्ष रात्री 2 वाजून 24 मिनिटांपर्यंत असेल. पण सूतक कालावधी हा 9 तासांपूर्वी सुरु होईल. त्यामुळे सूतक काल दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी सुरु होईल.
चंद्रग्रहण असल्याने या वेळेत शुभ कार्य केली जात नाहीत. इतकंच काय तर मंदिरं देखील बंद केली जातात. त्यामुळे खुल्या आकाशाखाली खीर ठेवणं योग्य ठरणार नाही, असं ज्योतिष्यांचं म्हणणं आहे. रात्री ग्रहण संपल्यानंतर खीर ठेवू शकता. पण तिथपर्यंत पौर्णिमेची तिथी संपलेली असेल. ग्रहण कालावधीत चंद्राकडून हानीकारक किरणं पडतात अशी मान्यता आहे. त्यामुळे खीर न ठेवलेलीच बरी असं ज्योतिष्यांचं म्हणणं आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)