
मुंबई : मंगळवार हा बजरंगबली हनुमानाला समर्पित दिवस आहे. अनेक जण या दिवशी उपवास करतात. हनुमानाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी अनेक जण मंगळवारचे व्रत (Mangalwar Vrat) देखील पाळतात. या दिवशी उपवास आणि व्रत पाळणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारचे व्रत अत्यंत प्रभावी असून साधकाला याचे परिणाम लगेच अनुभवायला मिळतात. या व्रताने हनुमानजींचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच शिवाय यासोबतच व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. वाईट कर्मांपासूनही त्याचे रक्षण होते. मंगळ दोषामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येतात तसेच शुभ कार्यात अडथळे येतात. यासाठी सुद्धा मंगळवारचे व्रत लाभदायक मानले जाते
मंगळवारी सकाळी आंघोळ केल्यावर लाल रंगाचे कपडे घाला. हनुमानजींची आराधना करा आणि व्रताचा संकल्प घ्या. त्यानंतर मंगळ मंत्राचा जप करावा. यानंतर संध्याकाळी हनुमानजींना शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. हनुमानजींची आरती करावी. जेवणात फक्त गोड पदार्थांचे सेवन करा आणि मीठ टाळा.
“ओम अंगारकाय नमः”
“ओम क्रीं क्रौं सह भौमाय नमः”
साधकाने 3रा, 5वा, 7वा, 11वा किंवा 21मंगळवार उपवास करून त्याचे उद्यापन करावे. उद्यापन करताना हनुमान किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात 7 नारळ अर्पण करा. पंचामृताचा नैवेद्य दाखवा. गरीब किंवा ब्राह्मणांना अन्नदान करा. मंदिरात लाल रंगाचा ध्वज अर्पण करा. उद्यापनाच्या दिवशी रक्तचंदनाची माळ धारण करावी. ही माळ सात दिवस धारण करा.
मंगळवारच्या व्रतामध्ये शुद्धतेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. पूजेच्या वेळी मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. आपण कोणत्याही गोड पदार्थाचे दान केले तर ते स्वतः स्वीकारू नका. काळे किंवा पांढरे कपडे घालून हनुमानजीची पूजा करू नका. लाल कपडे घालणे चांगले. उपवास करणाऱ्याने दिवसातून एकदाच जेवण करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)