Navratri 2026 : नवरात्रीत देवीला चुकूनही अर्पण करू नका ‘या’ 5 गोष्टी; पूजेपूर्वी जाणून घ्या नियम
Navratri 2026: शारदीय नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची मनोभावे पूजा केली जाते. पूजेसाठी फुले, नैवेद्य आणि इतर साहित्य अर्पण करताना काही गोष्टी मात्र टाळल्या जातात. नवरात्रीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत, जाणून घ्या.

देवीची पूजा करताना प्रत्येक वस्तू श्रद्धेने अर्पण केली जाते; मात्र पूजेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूला धार्मिक परंपरेत मान्यता असेलच असे नाही. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या विविध रूपांची मनोभावे पूजा केली जाते, त्यामुळे या काळात पूजेचे साहित्य निवडताना विशेष काळजी घेतली जाते. फुले, नैवेद्य आणि इतर पूजावस्तू अर्पण करताना काही गोष्टी मात्र टाळल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार, या वस्तू देवीच्या पूजेत वर्ज्य मानल्या जातात. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने होणार आहे. त्यामुळे नवरात्रीची पूजा सुरू करण्यापूर्वी देवीला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तुळशीची पानं अर्पण करू नका
देवी दुर्गेच्या पूजेत तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे नवरात्रीत देवीला नैवेद्य किंवा पूजेच्या साहित्यामध्ये तुळशीची पाने ठेवणे टाळावे.
धोत्रा आणि रुईची फुले टाळा
धोत्रा आणि रुईची फुले प्रामुख्याने भगवान शिवाला प्रिय मानली जातात. त्यामुळे ही फुले देवी दुर्गेच्या पूजेत अर्पण करू नयेत, असे सांगितले जाते.
कण्हेरी आणि केतकीची फुले वाहू नका
नवरात्रीच्या काळात देवीच्या पूजेसाठी फुले निवडताना कण्हेरी आणि केतकीची फुले टाळण्याचा सल्ला दिला जातो. ही फुले देवीच्या पूजेत वर्ज्य मानली जातात.
शिळी किंवा खराब फळे अर्पण करणं टाळा
देवीला नैवेद्य दाखवताना नेहमी ताजी आणि स्वच्छ फळे वापरावीत. कुजलेली, खराब झालेली, कापलेली किंवा जमिनीवर पडलेली फळे देवीला अर्पण करू नयेत. पूजेसाठी शुद्ध आणि ताज्या वस्तूंचाच वापर करावा.
कांदा-लसूण असलेले तामसिक पदार्थ टाळा
नवरात्रीच्या पूजेदरम्यान देवीला कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ किंवा इतर तामसिक भोजन अर्पण करू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. देवीला सात्त्विक नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
यंदा नवरात्री कधीपासून?
यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२६, रविवार रोजी घटस्थापनेने होणार आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.१९ ते १०.१२ वाजेपर्यंत आहे. तर अभिजीत मुहूर्त सकाळी ११.४४ ते दुपारी १२.३१ वाजेपर्यंत असेल. यंदा दुर्गाष्टमी आणि महानवमी १९ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी येणार आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)