
वास्तुशास्त्रात काही वनस्पतींना व झाडांना खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. केळीचे झाड हे या शुभ आणि पवित्र वनस्पतींपैकी एक आहे. भगवान विष्णू केळीच्या झाडावर वास करतात. घराच्या आसपास केळीचे झाड असल्यास ते समृद्धी, शांती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे. गुरुवारी केळीची पूजा करणे शुभ मानले जाते. कारण गुरूवार हा भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पति यांना समर्पित आहे. तर तुम्हालाही तुमच्या घराच्या आसपास केळीचं झाडं लावायचे असेल तर त्यासाठी योग्य दिशा कोणती आहे ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.
धार्मिक समारंभांमध्ये अनेक मंदिरं आणि घरं सजवण्यासाठी केळीचे खाबं तसेच पानांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. केळीच्या झाडाला शुभतेचे प्रतीक मानले जाते म्हणून शुभ प्रसंगी केळीच्या झाडांचा वापर केला जातो. केळीच्या झाडाला जीवनात स्थिरतेचे प्रतीक देखील मानले जाते. त्याचे मजबूत खोड आणि मोठी पाने जतन आणि विस्तार दर्शवतात.
या दिशेला केळीचे झाड लावा
वास्तुशास्त्रात घराच्या अंगणात ईशान्य दिशेला केळीचे एक छोटं रोप लावण्याची शिफारस केली आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कौटुंबिक जीवन आनंदी होते. असे मानले जाते की जिथे हे केळीची झाड बहरते त्या घरात संपत्ती आणि समृद्धी भरपूर प्रमाणात असते. या दिशेला केळीचे झाड लावल्याने घरात शांती, यश आणि सौभाग्य येते. याशिवाय केळीचे झाडं घराच्या समोर लावता येत नाही. घराच्या मागील बाजूस केळीचे झाडं लावणे शुभ मानले जाते. या वास्तु नियमाचे पालन केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठी राहतो.
धार्मिक कथांनुसार
वास्तुनुसार काही रोपांची व झाडांची शक्ती घराच्या वातावरणावर थेट परिणाम करते, म्हणूनच घराच्या अंगणात केळीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार केळीच्या झाडाची पूजा केल्याने घरात लक्ष्मी येते. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी, हळद आणि कुंकू अर्पण केल्याने आणि दिवा लावल्याने कुटुंबाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. ग्रहांचे अडथळे दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)