घरात अन् ऑफिसमध्ये तुमचे देखील सतत वाद होतायत? विदुर नीतीचे हे नियम तुमचं आयुष्य बदलतील

ऑफिस असो वा घर, नाती बिघडू नयेत म्हणून विदुर नीतीचे ‘हे’ नियम नेहमी लक्षात ठेवा. एकदा लक्षात ठेवले तर परत कधीच होणार नाही नात्यात दुरावा.

घरात अन् ऑफिसमध्ये तुमचे देखील सतत वाद होतायत? विदुर नीतीचे हे नियम तुमचं आयुष्य बदलतील
| Updated on: Aug 11, 2026 | 5:48 PM

आपल्या तोंडून निघालेले शब्द एखाद्या व्यक्तीला उभारी देऊ शकतात तर चुकीचे किंवा कटू शब्द एखादं नातं कायमचं तोडू शकतात. तलवारीची जखम कदाचित काळानुसार भरून येते; मात्र कठोर शब्दांनी झालेली मनाची जखम अनेकदा आयुष्यभर लक्षात राहते. त्यामुळेच बोलताना शब्दांचा योग्य वापर आणि योग्य वेळी मौन बाळगण्याचं महत्त्व सांगितलं जातं.

महाभारत काळातील महात्मा विदुर यांनी आपल्या नीतीवचनांमधून वाणी, व्यवहार आणि जीवन जगण्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, कोणतीही गोष्ट बोलण्याआधी विचार करणं आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त बोलणं किंवा समोरच्याचा विचार न करता शब्दांचा वापर करणं अनेकदा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतं.

गोड आणि मोजून-मापून बोलण्याचं महत्त्व

विदुर नीतीनुसार, माणसाने नेहमी सत्य, प्रिय आणि गोड वाणी बोलण्याचा प्रयत्न करावा. विचार न करता बोललेले शब्द अनेकदा स्वतःच्याच अडचणी वाढवू शकतात. कारण एकदा तोंडातून शब्द बाहेर पडले की ते पुन्हा मागे घेता येत नाहीत.

आपली भूमिका स्पष्टपणे आणि नम्रपणे मांडली तर समोरच्या व्यक्तीच्या मनातही आपल्याबद्दल आदर निर्माण होतो. याउलट कटू आणि अपमानास्पद शब्द समोरच्याच्या मनाला खोलवर दुखावू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शब्दांची निवड काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे.

ऑफिसमध्येही सांभाळून बोला

आजच्या धावपळीच्या कामाच्या वातावरणात विदुर नीतीतील हे विचार अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. ऑफिसमध्ये सहकारी किंवा वरिष्ठांशी बोलताना घाईघाईने प्रतिक्रिया देणं टाळावं. गरजेपेक्षा जास्त बोलणं, सहकाऱ्यांची निंदा करणं किंवा चुगली करणं यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते.

मीटिंगमध्ये किंवा चर्चेदरम्यान आपलं मत मांडताना तथ्य आणि तर्काच्या आधारे मोजकं बोलणं अधिक प्रभावी ठरतं. जेव्हा आपलं मत विचारलं जातं, तेव्हा स्पष्ट आणि मुद्देसूदपणे बोलणाऱ्या व्यक्तीच्या मताला अधिक गांभीर्याने घेतलं जातं.

डिस्क्लेमर : हा लेख महाभारतकालीन विदुर नीतीशी संबंधित पौराणिक मान्यता आणि जीवन व्यवस्थापनाच्या विचारांवर आधारित आहे. याचा उद्देश वाचकांना दैनंदिन जीवनातील संवाद आणि व्यवहाराबाबत सामान्य माहिती देणे हा आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us