घरात जुळ्या नागांचे फोटो लावण्याचे आहेत भरपूर फायदे, फक्त योग्य दिशा लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रानुसार घरात नागदेवतेची फोटो लावणे हे शुभ मानले जाते. योग्य दिशेला ठेवल्यास मिळू शकतात अनेक सकारात्मक लाभ. कोणत्या दिशेला लावावा फोटो? जाणून घ्या सविस्तर

हिंदू धर्मपरंपरेत नागांना दैवी रक्षकाचे स्थान देण्यात आले आहे. नाग हे प्रजननशक्ती, ऊर्जा, संरक्षण आणि विश्वातील संतुलनाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे नागपूजेला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. अनेक श्रद्धांनुसार, जीवन आणि मृत्यू यांच्यातील संतुलन कायम ठेवण्यातही नागांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते.
वास्तुशास्त्रातही नागदेवतेच्या प्रतिमा किंवा चित्रांना विशेष स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला नागांची चित्रे लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास, मानसिक शांतता लाभण्यास तसेच घरात सुख-समृद्धी आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते अशी मान्यता आहे.
नागदेवतेचे चित्र ठरते संरक्षण कवच
वास्तुशास्त्रानुसार घरात नागदेवतेचे चित्र लावणे हे संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. विशेषतः लपलेले शत्रू, मत्सर करणारे लोक किंवा नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळावे, यासाठी नागदेवतेचे चित्र घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे. या दिशेत नागदेवतेची प्रतिमा ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संकटांपासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे.
भगवान शिव आणि नागांची प्रतिमा
भगवान शिव आणि नाग यांचे अतूट नाते आहे. शिवाच्या गळ्यातील नाग हे निर्भयता, शक्ती आणि आत्मसंयमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ध्यानमुद्रेत असलेल्या भगवान शिवांसोबत नागाचे चित्र घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
अशी प्रतिमा घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय वाढतो, घरात शांतता टिकून राहते आणि मानसिक तणाव, चिंता तसेच अति विचार करण्याची प्रवृत्ती कमी होण्यास मदत होते अशी वास्तुशास्त्रीय मान्यता आहे.
जोडीतील नागांचे चित्र
दोन नाग एकमेकांसमोर उभे असलेले किंवा एखाद्या मध्यवर्ती चिन्हाभोवती वेटोळे घालून दाखवलेले फोटो संतुलन आणि समन्वयाचे प्रतीक मानले जाते. योगशास्त्रातील इडा आणि पिंगला नाड्यांच्या संकल्पनेशी अशा प्रतिमांचा संबंध जोडला जातो. त्यामुळे जोडीतील नागांचे चित्र घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक तसेच आध्यात्मिक संतुलन राखण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
टीप: वरील सर्व माहिती ही पारंपरिक वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. या उपायांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा, वास्तूची रचना, स्थान आणि इतर परिस्थितीनुसार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे याकडे निश्चित लाभ देणारा उपाय म्हणून नाही तर पारंपरिक वास्तुशास्त्रीय माहिती म्हणून पाहावे.