
T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्डकपची (T20 World Cup 2026) वेळ हळूहळू जवळ यायला लागली आहे. पुढल्या महिन्यात म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून हा वर्ल्डकप सुरू होणार असून या स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघासह अनेक संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत.पण याच स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या एका स्टार खेळाडूला दुखापतीमुळे 2026 च्या टी20 वर्ल्डकपमधून बाहेर पडावे लागले आहे. या खेळाडूच्या जागी लवकरच दुसऱ्या खेळाडूची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
टी20 वर्ल्डकप मधून हा खेळाडू बाहेर
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो पुढील आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून आणि २०२६ च्या टी-20 वर्लडकप स्पर्धेतून देखील बाहेर पडला आहे. रिपोर्टनुसार, नवीन उल हक याच्यावर या महिन्याच्या अखेरीस शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र, नवीनच्या दुखापतीबाबत अधिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन-उल-हक हा शेवटचा डिसेंबर 2024 मध्ये अफगाणिस्तानकडून खेळला होता. त्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे तो 2025 चा आशिया कप खेळू शकला नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) नवीन उल हक याच्याऐवजी बदली खेळाडूची अद्याप घोषणा केलेली नाही. मात्र असं असलं तरी टी-20 वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडूंमध्ये मिस्ट्री स्पिनर गझनफर, फलंदाज इजाज अहमदझाई आणि वेगवान गोलंदाज झिया उर रहमान शरीफी यांचा समावेश आहे, त्यामुळे या तीन खेळाडूंपैकी कोणालाही मुख्य संघात स्थान मिळू शकते. 2026 सालच्या टी-२० वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानला गट डी मध्ये स्थान देण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये असल्यावनर त्यांचा सामना न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, यूएई आणि कॅनडा यांच्याशी होईल. अफगाणिस्तानचा संघ येत्या 8 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळेल.
अफगाणिस्तानचा संघ
राशिद खान (कर्णधार), इब्राहिम जादरान (उपकर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहिदुल्लाह कमाल, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नैब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी आणि अब्दुल्ला अहमदजई.
राखीव खेळाडू : एएम गजनफर, इजाज अहमदजई आणि जिया उर रहमान शरीफी.