
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना तिचं लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदा एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिली. संगीतकार पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं गेल्यानंतर आता स्मृती आगामी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी तयारी करणार आहे. या सर्व घडामोडींदरम्यान स्मृतीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ती कठीण परिस्थितीला कशी सामोरं जाते, याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. स्मृती तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचं श्रेय क्रिकेटला देते. कठीण प्रसंगांमध्ये सकारात्मक राहण्यासाठी ती पुढील कामावर लक्ष केंद्रीत करते.
तीन वर्षांपूर्वी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत स्मृती म्हणाली, “माझ्यासाठी हे खूप सोपं आहे. माझी छोटी-छोटी ध्येय असतात. त्यामुळे जर मला आज निराश वाटत असेल, तर मी पुढच्या सहा दिवसांत किंवा पुढच्या सात दिवसांत माझ्या बॅटिंगमध्ये किंवा फिटनेसमध्ये कोणत्या गोष्टींवर काम करायचं आहे, ते लिहायला सुरुवात करते. एकदा मी ते करायला सुरुवात केली की, आजूबाजूला काय चाललं आहे ते मी विसरून जाते. मी फक्त मला काय करायचं आहे, त्यावर लक्ष केंद्रित करते.”
“त्यामुळे जेव्हा मी पुढील सहा ते सात दिवसांत काय करायचं आहे याबद्दल विचार करते, तेव्हा मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की पुढे खूप काही चांगलं घडणार आहे”, असं तिने पुढे सांगितलं. वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या धक्क्यानंतर स्मृती आता नव्याने सुरुवात करण्यासाठी तयारी करत आहे. “तुम्ही नेहमी तुमचा दिवस एक नवीन दिवस म्हणून सुरू केला पाहिजे, कारण तुम्ही शतक जरी केलं असलं तरी तुम्ही तुमच्या डावाची सुरुवात शून्यापासून करता. मी शिकलेल्या गोष्टींमधून हा सर्वांत मोठा धडा आहे. तुमच्या आयुष्यात काहीही झालं तरी पुढचा दिवस एक नवीन दिवस असतो”, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणते.
स्मृती नुकतीच ‘अॅमेझॉन संभव समिट’मध्ये उपस्थित राहिली. या कार्यक्रमात तिने क्रिकेटविषयीचं तिचं प्रेम व्यक्त केलं. “मला वाटत नाही की मी क्रिकेटपेक्षा जास्त कोणत्या गोष्टीवर प्रेम करत असेन. भारताची जर्सी घातल्याने आम्हाला प्रेरणा मिळते. तुम्ही तुमच्या सर्व समस्या बाजूला ठेवता आणि केवळ हाच विचार तुम्हाला जीवनात लक्ष केंद्रीत करण्यास मदत करतो. मला लहानपणापासूनच बॅटिंगचं प्रचंड वेड होतं. ते कोणालाही समजलं नाही, पण माझ्या मना मला नेहमीच वर्ल्ड चॅम्पियन म्हणून ओळखलं जाण्याची इच्छा होती.”