22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास

| Updated on: Feb 21, 2020 | 1:27 PM

जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने सुवर्णपदक पटकावलं होतं

22 वर्षीय सुवर्ण पदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, क्रीडा प्रबोधिनीतच गळफास
Follow us on

अकोला : सुवर्ण पदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 वर्षीय प्रणवने अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत गळफास (Akola Boxer Pranav Raut Suicide) घेतला.

जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने सुवर्णपदक पटकावलं होतं. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रणवने आयुष्य संपवल्याची माहिती आहे.

आत्महत्येविषयी माहिती मिळताच क्रीडा प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

प्रणव आज (शुक्रवार 21 फेब्रुवारी) सकाळी क्रीडा प्रबोधनीत आला होता. बराच वेळ तो खोलीतून बाहेर न आल्यामुळे मित्रांनी दरवाजा ठोठावला, मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. दरवाजा आतून बंद असल्यामुळे अखेर प्रणवच्या मित्रांनी दार तोडलं. त्यावेळी प्रणव फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.

प्रणवने ऐन उमेदीच्या वयात अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याचा सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अकोल्यासह राज्यभरातील क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणवच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Akola Boxer Pranav Raut Suicide)

हेही वाचा – ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ जिंकलेल्या विरारच्या बॉडीबिल्डरची आत्महत्या