
रणजी ट्रॉफी ही भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंट आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या टुर्नामेंटच महत्व लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरुन आता वादविवाद सुरु झालाय. रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवरुन टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मिडिया आणि क्रिकेट सिस्टिम दोघांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. “रणजी ट्रॉफी ही देशातील महत्वाची क्रिकेट स्पर्धा आहे. आयपीएल किंवा अंडर-19 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी रणजीमध्ये दमदार कामगिरी करुनही मिळत नाही” याकडे सुनील गावस्कर यांनी लक्ष वेधलं. गावस्कर यांनी आपल्या कॉलममध्ये अशा अनेक फलंदाजांचा उल्लेख केलाय, ज्यांनी या सीजनमध्ये 700 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण त्यांच्या प्रदर्शनावर चर्चा झालेली नाही. रविचंद्रन स्मरण, सनत सांगवान, दीप कुमार घरामी, सिद्धेश लाड, अरमान जाफर आणि कुनाल चंदेला यांची नाव गावस्कर यांनी आपल्या कॉलममध्ये घेतली आहेत.
त्याशिवाय गोलंदाजांमध्ये मंयक मिश्रा आणि सिद्धार्थ देसाई आहेत. त्यांनी या सीजनमध्ये 40 पेक्षा जास्त विकेट घेतले आहेत. पण त्यांच्या प्रदर्शनावर जास्त बातम्या आल्या नाहीत. सुनील गावस्कर यांनी उदहारण देताना जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकीब नबीचं नाव घेतलं. दिल्ली कॅपिटल्सने या गोलंदाजाला 8.4 कोटी रुपयामध्ये विकत घेतलं नसतं तर रणजी ट्रॉफीमध्ये इतकं चांगलं खेळूनही या खेळाडूची चर्चा झाली नसती असं सुनील गावस्कर म्हणाले.
गावस्कर अजून काय म्हणाले?
खेळाडू जेव्हा आयपीएल खेळतात, तेव्हा त्यांना ओळख मिळते असं गावस्कर म्हणाले. टीव्ही कव्हरेज आणि सोशल मीडियामुळे आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन करणारे खेळाडू लगेच चर्चेत येतात. तेच रणजी ट्रॉफीमध्ये धावा बनवणाऱ्या आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळत नाही असं गावस्कर म्हणाले. अनेक जण आयपीएल आणि अंडर 19 वर्ल्ड कपला टीम इंडियामध्ये येण्याचा शॉर्टकट मानतात असं गावस्कर म्हणाले. यासाठी फक्त निवडकर्ते जबाबदार आहेत की,मीडिया आणि क्रिकेटशी संबंधित दुसरे प्लॅटफॉर्म जे खेळाडूंकडे दुर्लक्ष करतात याकडे गावस्कर यांनी लक्ष वेधलं.
गावस्कर यांच्या परखड विचारांमुळे एक नवीन चर्चा
भारतीय क्रिकेटला मजबूत बनवायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेटला सुद्धा तितकचं प्राधान्य द्यावं लागेल असं गावस्कर म्हणतात. रणजी ट्रॉफीमध्ये दमदार खेळणारे प्लेयर पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाचा कणा बनतात असं गावस्कर म्हणाले. येणाऱ्या दिवसात रणजी ट्रॉफीच्या फायनल सारख्या सामन्यांना जास्त कवरेज मिळेल. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत करणाऱ्या खेळाडूंना त्यांचा हक्क मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गावस्कर यांच्या परखड विचारांमुळे एक नवीन चर्चा सुरु झाली आहे.