
गॉड ऑफ क्रिकेट अर्थात क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरच लाखो नव्हे कोट्यावधी चाहते आहेत आणि आज ते सर्वच सचिनसाठी आनंदी असतील. कारण सचिनचा लाडका लेक, अर्जुन तेंडुलकर आता लवकरच नवरदेव बनणार आहे. हो, हे खरं आहे. सचिनचा मुलगा अर्जुन याचा नुकताच सानिया चंडोकशी साखरपुडा झाला. दोन्ही कुटुंबियांच्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत अर्जुन-सानियाची एंगेजमेंट झाली. अर्जुनचं जिच्याशी लग्न ठरलं आहे, ती कोणत्याही सामान्य कुटुंबातील नव्हे तर मुंबईतील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील मुलगी आहे. अर्जुनची होणारी वधू सानिया चांडोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (लो कॅलरी आईस्क्रीम ब्रँड) ची मालकी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात झाला, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील अगदी जवळचे लोक आणि निवडक लोक उपस्थित होते.
अर्जुनच तेंडुलकरचं शिक्षण
अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. क्रिकेट त्याच्या रक्तातच आहे, कारण त्याला त्याचे वडील, सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजाकडून प्रेरणा मिळाली आहे.
शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, अर्जुनने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याचे शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. त्याने खूप लहान वयातच खेळ खेळायला सुरुवात केली. त्याने 22 जानेवारी 2010 रोजी पुण्यात झालेल्या अंडर-13 स्पर्धेत पदार्पण केले.
सानियाचं शिक्षण कुठून ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया चांडोकने अभ्यासासोबतच व्यवसायातही प्रसिद्धी मिळवली आहे. तिने लंडनमधील टॉप लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून तिचे शिक्षण पूर्ण केले, जे जगातील टॉप शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. सानियाने स्वतःला अभ्यासापुरते मर्यादित ठेवले नाही तर तिने मुंबईत Mr Paws नावाचे एक प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर देखील स्थापन केले. तिचा ब्रँड पाळीव प्राण्यांची काळजी आणि लक्झरी सेवांसाठी ओळखला जातो.
कुटुंबाकडून अधिकृत घोषणा नाही
अर्जुन-सानियाचा साखरपुडा झाला असला तरी दोन्ही कुटुंबाकडून अद्यापही या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही किंवा कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या साखरपुड्याचे वृत्त येताच सोशल मीडियावर खळबळ माजली. चाहत्यांनीही सचिनचा लेक आणि होणाऱ्या सूनबाईंना शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे.