पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मिळालं कांस्यपदक,12 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं, भारतीय संघाचं काय?
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट प्रकारात पाकिस्तानने कांस्य पदक जिंकले आहे. मंगळवारी झालेल्या कांस्य पदकाच्या सामन्यात पाकिस्तानी महिला संघाने बांगलादेशला ३१ धावांनी पराभूत केले.

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट प्रकारात पाकिस्तानने कांस्य पदक जिंकले आहे. मंगळवारी झालेल्या कांस्य पदकाच्या सामन्यात पाकिस्तानी महिला संघाने बांगलादेशला ३१ धावांनी पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानचा श्रीलंकेकडून, तर बांगलादेशचा भारताकडून पराभव झाला होता. सुवर्णपदकाचा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. १२ व्या षटकापर्यंत, त्यांचा निम्मा संघ केवळ ६७ धावांवर तंबूत परतला होता. या महत्त्वाच्या क्षणी कर्णधार फातिमा सनाने सूत्रे हाती घेतली आणि केवळ ३० चेंडूंमध्ये ४५ धावांची आक्रमक खेळी करून संघाला एका आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १४५ धावा केल्या. फातिमा व्यतिरिक्त, गुल फिरोझाने २३ चेंडूंमध्ये ३१ धावा आणि आलिया रियाझने २५ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून नाहिदा अख्तर, शोर्ना अख्तर आणि रितू मोनी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
१४६ धावांचे लक्ष्य गाठताना बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली, धावसंख्या २० पर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. कर्णधार निगार सुलताना (२५) आणि शर्मिन अख्तर (४६) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु वाढत्या धावगतीच्या दबावाखाली संपूर्ण संघ कोसळला.
पाकिस्तानची ऑफ-स्पिनर उम-ए-हानीने भेदक गोलंदाजी करत तीन बळी घेतले आणि बांगलादेशची मधली फळी उद्ध्वस्त केली. बांगलादेश २० षटकांत लक्ष्यापासून ३१ धावांनी दूर राहिला. बांगलादेश २० षटकांत सात गडी गमावून केवळ ११४ धावाच करू शकला. आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पाकिस्तानचे हे एकूण दुसरे पदक आहे.
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ सुवर्ण पदकासाठी मैदानावर उतरणार आहे. आता भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळणार की नाही हे आज समजेल.