बॉलिवूड सेलिब्रिटींना सतावतेय भीती, थेट मुंबई पोलिसांकडे घेतली धाव; केली ही मोठी मागणी
Bollywood Celebs: बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही सेलिब्रिटींनी तर थेट मुंबई पोलिसांकडे धाव घेत त्यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. नेमकं असं काय घडलं, ते सविस्तर जाणून घ्या..

Bollywood: बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना एक्स-कॅटेगरी सुरक्षा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही कलाकारांनी विशेष सुरक्षेची मागणी करत मुंबई पोलिसांकडे संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडच्या काळात चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मिळणाऱ्या धमक्या आणि टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून, संबंधित कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.
आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफसह अनेक कलाकारांची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुराना आणि टायगर श्रॉफ यांच्यासह बॉलिवूडमधील काही कलाकारांनी विशेष पोलीस सुरक्षेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, केवळ अर्ज केल्यामुळे संबंधित कलाकारांना तातडीने सुरक्षा दिली जाणार नाही. मुंबई पोलिसांकडून प्रत्येक अर्जाची स्वतंत्रपणे छाननी केली जाणार आहे. संबंधित व्यक्तीला नेमका कोणता धोका आहे, धमकीची पार्श्वभूमी काय आहे आणि संभाव्य हल्ल्याची शक्यता किती आहे, याचं मूल्यांकन केलं जाईल. त्यानंतरच सुरक्षा पुरवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
काय असते एक्स-कॅटेगरी सुरक्षा?
भारतात व्हीव्हीआयपी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांच्या धोक्याच्या पातळीनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सुरक्षा दिली जाते. यामध्ये एक्स, वाय, वाय प्लस, झेड आणि झेड प्लस अशा सुरक्षा श्रेणींचा समावेश होतो. एक्स-कॅटेगरी सुरक्षा ही तुलनेने कमी स्तरावरील विशेष सुरक्षा व्यवस्था मानली जाते. या व्यवस्थेत सामान्यतः दोन सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाऊ शकतात. मात्र, प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था संबंधित व्यक्तीच्या धोक्याचं मूल्यांकन आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार बदलू शकतं.
गोळीबाराच्या घटनांमुळे चिंता वाढली
गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित अलीकडील गोळीबाराच्या घटनेमुळेही हा विषय चर्चेत आला आहे. चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांना धमकीचे फोन, संदेश आणि खंडणीसाठी दबाव आणण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अनेक कलाकार आपल्या वैयक्तिक सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत.
