डॉक्टरांनीही हात टेकलेले, फक्त प्रार्थनाच कामी येईल; एका सर्जरीमुळे अभिनेत्रीचं करिअर संपलं
Koena Mitra: 'साकी साकी' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री कोएना मित्रा हिचा आयुष्यातील एक निर्णय करिअरसाठी महागात पडला. कोएनाने तिच्या नाकाची सर्जरी केली होती. मात्र त्याचे उलट परिणाम तिला भोगावे लागले होते.

Koena Mitra: बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराला लोकप्रियता मिळवण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. मात्र, एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण करिअरला ब्रेक लागू शकतो. असंच काहीसं अभिनेत्री कोएना मित्रा हिच्यासोबत घडलं. ‘साकी साकी’ या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धी मिळवणारी कोएना एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, नाकाची सर्जरी केल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. या सर्जरीचा परिणाम केवळ तिच्या चेहऱ्यावरच नाही, तर तिच्या अभिनय कारकिर्दीवरही झाला. विशेष म्हणजे, तिची प्रकृती पाहून डॉक्टरांनीही हात टेकले होते. ‘आता फक्त औषधं आणि प्रार्थनाच कामी येतील’, असं डॉक्टरांनी सांगितल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता.
‘साकी साकी’ गाण्यामुळे मिळाली ओळख
कोएना मित्राचा जन्म कोलकाता इथं झाला. तिने मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. 2002 मध्ये ग्लॅडरॅग्स सुपरमॉडेल स्पर्धा जिंकल्यानंतर तिने मनोरंजनविश्वात प्रवेश केला. राम गोपाल वर्मा यांच्या ‘रोड’ चित्रपटातील ‘खुल्लम खुल्ला’ या गाण्यातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुसाफिर’ चित्रपटातील ‘साकी साकी’ या गाण्यामुळे ती विशेष लोकप्रिय झाली. या गाण्यात संजय दत्तसोबत तिची जोडी पाहायला मिळाली होती. यानंतर ‘एक खिलाडी एक हसीना’, ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘इन्सान’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं.
नाकाची सर्जरी ठरली आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट
View this post on Instagram
2006-2007 च्या दरम्यान कोएनाने राइनोप्लास्टी म्हणजेच नाकाची सर्जरी केली होती. मात्र, सर्जरीनंतर तिच्या चेहऱ्याच्या हाडांना सूज येऊ लागली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की डॉक्टरांनाही तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याबाबत खात्री देता येत नव्हती. 2013 मध्ये मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत कोएनाने या अनुभवाबद्दल सांगितलं होतं. सर्जरीनंतर डॉक्टरांनी औषधं आणि प्रार्थनांशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगितलं होतं, असा खुलासा तिने केला होता. सुरुवातीला सहा महिने घरात राहण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता. मात्र, सतत घरात राहणं शक्य नसल्याने तिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिच्या बदललेल्या चेहऱ्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या. याबद्दल बोलताना कोएना म्हणाली होती की, तिने सर्जरीची गोष्ट कधीही लपवली नाही. मात्र, लोकांनी तिच्या दिसण्यावरून अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिल्या. काही जवळच्या मित्रांनीही तिची साथ सोडली.
तीन वर्षे सहन केला मानसिक त्रास
2021 मध्ये झूमला दिलेल्या मुलाखतीत कोएनाने सांगितलं होतं की, सर्जरी ही कोणती मोठी इम्प्लांट सर्जरी नव्हती, तर एक साधी करेक्टिव्ह प्रक्रिया होती. मात्र, तिच्या शरीराने त्यावर वेगळी प्रतिक्रिया दिली. 2022 मध्ये ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या अनुभवाला तीन वर्षांचा त्रासदायक काळ असं म्हटलं होतं. सर्जरीनंतर सलग तीन वर्षे तिला नकारात्मक प्रसिद्धीचा सामना करावा लागला. लोकांकडून मिळणाऱ्या टीकेमुळे तिच्या करिअरवरही परिणाम झाला.
हॉलिवूडमध्येही आजमावलं नशीब
बॉलिवूडमधील संधी कमी झाल्यानंतर कोएना 2011 मध्ये लॉस एंजेलिसला गेली. तिथे तिने काही चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिल्या. मात्र, तिचे अनेक प्रोजेक्ट प्रत्यक्षात पूर्णत्वास गेले नाहीत. 2019 मध्ये ‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शोमधून ती पुन्हा चर्चेत आली. मात्र, या शोमधील तिचा प्रवास फार काळ टिकला नाही.
