
मुंबई: साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आजचे सामने रद्द (Maharashtra kesari wrestling tournament) करण्यात आले आहेत. अवकाळी पावसाचा फटका या स्पर्धेला बसला आहे. महाराष्ट्रातील कुस्ती पैलवान आणि कुस्ती प्रेमींना ( wrestling fans) ही स्पर्धा कधी होणार? याची उत्सुक्ता असते. पण पावसाने आजच्या आनंदावर पाणी फिरवलं आहे. कोरोना व्हायरसमुळे (Corona virus) तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी लायटिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ही लायटिंग व्यवस्था कोसळल्याचं फोटोंमधून दिसत आहे. बऱ्याच कालावधीनंतर होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील आजचे सामने रद्द झाल्याने कुस्ती प्रेमींचा हिरमोड झाला आहे. मंगळवारी सायंकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्या प्रयत्नामुळे तब्बल 61 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीचे यजमानपद साताऱ्याला मिळाले आहे. पाच दिवस चालणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विविध वजनी गटात कुस्त्या सुरु आहेत.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मातीचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. तर गादी प्रकारातील आखाडे सुध्दा तयार करण्यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यांमुळे सातारकरांना दोन सत्रात कुस्तीची रंगत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे एकाचवेळी 55 हजार प्रेक्षक एकाचं वेळी कु्स्ती पाहू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी अधिक गर्दी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.