Aus vs Ind 4th Test | बोलिंगने कमाल, बॅटिंगने धमाल, शार्दुल-सुंदरची रेकॉर्ड कामगिरी

| Updated on: Jan 17, 2021 | 4:22 PM

शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने 7 व्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली.

Aus vs Ind 4th Test | बोलिंगने कमाल, बॅटिंगने धमाल, शार्दुल-सुंदरची रेकॉर्ड कामगिरी
शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर
Follow us on

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या सामन्यातील (Aus vs Ind 4th Test) तिसऱ्या दिवसावर टीम इंडियाच्या वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या जोडीने छाप सोडली. टीम इंडियाचे टॉपचे फलंदाज अपयशी ठरले. यामुळे भारताची 6 बाद 186 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) शानदार शतकी कामगिरी करत टीम इंडियाचा डाव सावरला. 123 धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी अर्धशतक लगावलं. यासह या दोघांनी काही रेकॉर्ड ब्रेक केले. तसेच काही विक्रमांची बरोबरीही केली. (aus vs ind 4th test washington sunder and shardul thakur makes record)

वॉशिंग्टन-शार्दुलचे ‘सुंदर’ रेकॉर्ड

ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाकडून सातव्या विकेट्ससाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. शार्दुल आणि वॉशिंग्टन या नवख्या जोडीने सातव्या विकेटसाठी 123 धावा जोडल्या. यासह या दोघांनी ब्रिस्बेनवरील टीम इंडियाच्या 30 वर्षांपूर्वींच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. याआधी टीम इंडियाकडून ब्रिस्बेनमध्ये सातव्या विकेटसाठी 30 वर्षांपूर्वी 1991 मध्ये 58 धावांची सर्वोच्च भागीदारी करण्यात आली. मनोज प्रभाकर आणि कपिल देव या जोडीने ही भागीदारी केली होती.

वॉशिंग्टनची 73 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी

वॉशिंग्टनने पदार्पणातील सामन्यात गोलंदाजी करताना शानदार 3 विकेट्स घेतल्या. यानंतर फलंदाजी करताना झुंजार अर्धशतक लगावलं. पदार्पणात अशी कामगिरी करणारा सुंदर दुसरा भारतीय ठरला आहे. तसेच त्याने 73 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली. टीम इंडियाकडून 1947 मध्ये दत्तू फडकर (Dattu Phadkar) यांनी ऑस्ट्रेलियाविरोधात पदार्पणातील सामन्यात अशीच कामगिरी केली होती.

70 वर्षानंतर पहिल्यांदाच…..

वॉशिंग्टन आणि शार्दुलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच अर्धशतकही लगावली. क्रिकेट इतिहासात तब्बल 70 वर्षांनंतर असा योग जुळून आला. टीम इंडियाकडून 1951 मध्ये वीनू मांकड आणि दत्तू फडकर यांनी इंग्लडविरोधातील कोलकाता कसोटीत अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.

अति’सुंदर’ कामगिरी

वॉशिंग्टनने 62 धावा केल्या. यासह सुंदर ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणातील सामन्यात 7 व्या क्रमांकावर सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला. सुंदरने यासह राहुल द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. सुंदर राहुल द्रविडनंतर पदार्पणातील सामन्यात 7 व्या क्रमांकावर येत अर्धशतक लगावणारा दुसरा खेळाडू ठरला. द्रविडने 1996 मध्ये कसोटी पदार्पण केलं. द्रविडने या पदार्पणातील सामन्यात 95 धावांची खेळी केली.

मयंकचा कारनामा

मयंक अग्रवालने पहिल्या डावात शानदार 38 धावा केल्या. यामध्ये त्याने एक जोरदार सिक्स खेचला. यासह मयंकच्या नावे खेळलेल्या एकूण डावांपेक्षा अधिक सिक्स मारण्याचा विक्रम झाला. मयंक आतापर्यंत एकूण 22डावांमध्ये फलंदाजी केली आहे. तर एकूण 23 कसोटी सिक्स त्याने लगावले आहेत.

संबंधित बातम्या :

Shardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक

Aus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

(aus vs ind 4th test washington sunder and shardul thakur makes record)