
आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज संध्याकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांनी कोणीच, एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदा, आयपीएल 2025 ची ट्रॉफी उचलू शकतो. कारण आरसीबीचा स्टार प्लेअर विराट कोहलीच्या बाबतीत एक मोठा योगायोग (Coincidence) दिसून येत आहे.
आरसीबी कोरणार आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव ?
खरंतर योगायोग म्हणजे, विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 आहे आणि हा आयपीएलचा देखील हा 18 वा हंगाम आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजची तारीख आहे 3-6-2025. जर 3+6+2+0+2+5 अशी बेरीज केली तर तीदेखील एकूण 18 अशी होते.
जर आज आरसीबीचे नशीब चांगले असेल तर ते पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरू शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यापूर्वी दोनदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण 2009 मध्ये त्यांना डेक्कन चार्जर्सविरुद्ध अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता तर 2016 च्या हंगामात त्यांना सनरायझर्स हैदराबादने हरवत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे यंदा तरी आयपीलची फायनल जिंकून ही ट्रॉफी उचलावी अशी आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूची इच्छा असेल.
पंजाबलाही विजयाचे वेध
विशेष म्हणजे आरसीबीप्रमाणे, पंजाब किंग्जने एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.प्रीती झिंटाचा हा संघ कधीच विजेता बनला नाही. मात्र, या हंगामात पंजाब किंग्जने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता आरसीबीविरुद्धच्या अंतिम सामन्यात संघाचे खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणे खूप महत्वाचे आहे. त्यांनाही विजयाचे वेध लागले आहेत.
सध्या दोन्ही संघांसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत. श्रेयस अय्यरने क्वॉलिफायर-2 मध्ये आक्रमक फलंदाजी करत 87व धावा केल्या आणि त्यांच्या संघाला सामना जिंकून दिला. एवढेच नाही तर जर आपण विराट कोहलीबद्दल बोललो तर तोदेखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 55.82च्या सरासरीने 614 धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहली अंतिम सामन्यातही निश्चितच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.