CWG 2022 : उपांत्य फेरी गाठलेल्या भारताचा आता खऱ्या आव्हानाशी सामना, दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत

'मला विश्वास आहे, की आमचा संघ शेवट गोड करण्यासाठी चांगली कामगिरी करेल. खेळाडूंना उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा,' असं माजी हॉकी खेळाडू तिर्की यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

CWG 2022 : उपांत्य फेरी गाठलेल्या भारताचा आता खऱ्या आव्हानाशी सामना, दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत
पुरुष हॉकी संघ
Image Credit source: social
| Updated on: Aug 06, 2022 | 9:14 PM

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष संघाने गुरुवारी बर्मिंगहॅम येथे वेल्स संघावर 4-1 असा विजय मिळवून 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाला आता खऱ्या आव्हानाचा सामना करावा लागेल असे मत माजी हॉकी खेळाडू दिलीप तिर्की (Dilip Tirkey) यांनी व्यक्त केले आहे. भारताला आता खऱ्या आव्हानाचा सामना करावा लागेल, असंही तिर्की यांनी म्हटलंय. भारतीय संघ जिंकण्यासाठी सर्व खेळाडू आपली शक्ती पणाला लावत असल्याचे पाहून दिलीप तिर्की खूप उत्साहित झाले आहेत. भारतीय महिला संघही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. मात्र, शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा शूटआऊटमध्ये 3-0 ने पराभव करत महिला संघाला मोठा धक्का दिला.

उपांत्य फेरीत प्रवेश

दिलीप तिर्की यांनी काय म्हटलंय?

“अपेक्षेप्रमाणे, भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. खरे आव्हान आता सुरू होईल. मला विश्वास आहे, की आमचा संघ शेवट गोड करण्यासाठी चांगली कामगिरी करेल. खेळाडूंना उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा”, असे तिर्की यांनी कू अ‍ॅपवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

माजी हॉकी खेळाडू दिलीप तिर्की यांची पोस्ट

आजच्या सामन्याचे हायलाईट्सही वाचा

हायलाईट्स

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • कॉमनवेल्थ गेम्स 2022 हॉकी सेमीफायनल
  • आज (शनिवार, 6 ऑगस्ट)
  • रात्री 10.30 IST
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड
  • IND – 10
  • एसए – 2

दरम्यान, वेल्स विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार हरमनप्रित सिंगने शानदार हॅट्ट्रीक नोंदवली. या सामन्यात हरमनप्रितने 19, 20 व्या, आणि 40 व्या मिनिटाला असे तीन गोल केले यापैकी दोन गोल हरमनप्रित सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले. तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला. भारताचा चौथा गोल गुरजंत सिंगने नोंदवला. या दोघांनीही भारतीय संघाला सामन्यात मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात वेल्सचा एकमेव गोल 55 व्या मिनिटाला गॅरेथ फलाँगने केला, जो दिलासा देणारा ठरला.

दुसरीकडे महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सविताच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने निर्धारित वेळेत ऑस्ट्रेलियाला 1-1 ने बरोबरीत रोखले. त्यामुळे सामना शूटआउटवर गेला. शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅम्ब्रोसिया मेलोन, अ‍ॅमी लॉटन आणि कॅटलिन नॉब्स यांनी गोल करत भारताचा 3-0 असा पराभव केला.