टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी 12 संघ निश्चित, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं काय झालं? वाचा

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने सुरु असताना 2026 वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. दोन वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेसाठी 12 संघ निश्चित झाले आहेत. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत असल्याने दोन संघ थेट पात्र ठरले आहेत. तसेच सुपर 8 फेरीतील 8 संघाने थेट स्थान मिळालं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी 12 संघ निश्चित, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं काय झालं? वाचा
| Updated on: Jun 20, 2024 | 4:04 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाची तयारी आतापासून सुरु झाली आहे. 2026 मध्ये होणार टी20 वर्ल्डकप भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्तपणे होणार आहे. या स्पर्धेतही आतासारखेच 20 संघ खेळणार आहेत. पण 12 संघांना टी20 वर्ल्डकपचं थेट तिकीट मिळालं आहे. तर उर्वरित 8 संघांसाठी पात्रता फेरीची परीक्षा द्यावी लागणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 साठी निवड झालेल्या 12 संघांपैकी 8 संघ सध्या सुपर 8 फेरीतील आहेत. सुपर 8 फेरीत भारत असून 2026 वर्ल्डकपचं यजमानपदही आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीतून भारतासह इतर 7 संघ निश्चित झाले आहेत. यात पहिल्यांदा खेळणाऱ्या अमेरिकेचाही समावेश आहे. तर इतर चार संघ हे आयसीसी टी20 क्रमवारीच्या आधारे निवडले गेले आहेत. त्यामुळे साखळी फेरीतून बाद झालेल्या न्यूझीलंड आणि पाकिस्तानलाही थेट संधी मिळाली आहे. तर क्रमवारीचा विचार करता आयर्लंडचं नशिब फळफळलं आहे. त्यामुळे पुढच्या स्पर्धेसाठी आयर्लंड पात्रता फेरीशिवाय खेळणार आहे. श्रीलंकेचं अस्तित्वही साखळी फेरीतचं संपुष्टात आलं होतं. श्रीलंकेकडे संयुक्तिकरित्या यजमानपद आहे. वरून आयसीसी क्रमवारीचा फायदा झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेलाही थेट एन्ट्री मिळाली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 साठी 12 संघ निश्चित झाले आहेत. यात भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. त्यामुळे पुढचे आठ संघ कोणते असतील याची उत्सुकता आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये कॅनडा, स्कॉटलँड, नामिबिया, ओमान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेदरलँड आणि नेपाळ हे संघ खेळले होते. तर पात्रता फेरीत झिम्बाब्वे आणि केनियाची निराशाजनक कामगिरी राहिली होती. त्यामुळे स्थान मिळालं नव्हतं. आता या संघांपैकी कोणता संघ स्थान मिळवतो याची उत्सुकता लागून आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2026 वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी करत आहेत. टी20 वर्ल्डकपचं हे 10वं पर्व असेल. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने श्रीलंकेत आणि शेवटच्या पर्वातील सामने भारतात होण्याची शक्यता आहे. पण जून महिन्यात होणार की इतर कोणत्या महिन्यात याबाबत साशंकता आहे. कारण भारत आणि श्रीलंकेत या काळात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, मार्च-एप्रिल-मे या कालावधीत आयपीएलचं आयोजन केलं जातं. त्यामुळे ही स्पर्धा कोणत्या महिन्यात असेल असाही प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.