
जगभरात मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रेंचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे. म्हणजेच आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळणार नाही, तसेच तो बिग बॅश, पीएसएल किंवा इतर कोणत्याही लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली आहे.

डिव्हिलियर्सने शुक्रवारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. डिव्हिलियर्सने ज्या ट्विटमध्ये निवृत्तीची घोषणा केली ते खूप खास आहे. डिव्हिलियर्सने तीन भाषांमध्ये चाहत्यांचे आभार मानले, त्यापैकी एक हिंदी भाषा आहे.

डिव्हिलियर्सने स्वत:ला अर्धा भारतीय म्हटलं आहे. डिव्हिलियर्स म्हणाला, 'मी अर्धा भारतीय आणि अर्धा दक्षिण आफ्रिकेचा आहे. मी दक्षिण आफ्रिकेत राहीन पण माझ्या हृदयात भारताचे विशेष स्थान आहे. अर्धा भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.

एबी डिव्हिलियर्स 14 वर्षे आयपीएलचा भाग होता आणि त्यामुळेच भारतीय चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. 2007 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झालेल्या डिव्हिलियर्सने चौथ्या सत्रात आरसीबीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर तो या संघावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करू लागला. डिव्हिलियर्स निवृत्तीनंतर म्हणाला- 'मी नेहमी आरसीबीचाच राहीन. माझ्यासाठी आरसीबीशी संबंधित प्रत्येकजण कुटुंबासारखा आहे. लोक येत-जात राहतात पण आरसीबीवरील माझे प्रेम कायम राहील. मी अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.

डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151 पेक्षा जास्त होता. एबीडीने त्याच्या कारकिर्दीत 3 शतके, 40 अर्धशतके झळकावली आहेत.