T20 World Cup साठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या 8 जणांची निवड

Afghanistan T20I World Cup 2024 Squad : अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी वर्ल्ड कप 2024 साठी 15 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला आहे. तसेच राखीव म्हणून काही खेळाडूंचा समावेश केला आहे.

T20 World Cup साठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या 8 जणांची निवड
afghanistan cricket team rashid khan,
Image Credit source: afghanistan cricket X Account
| Updated on: May 01, 2024 | 3:26 PM

अफगाणिस्तानने मंगळवारी 30 एप्रिल रोजी रात्री उशिराने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच अफगाणिस्तानने कॅप्टन बदलला आहे. स्टार ऑलराउंडर राशिद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये हशमतुल्लाह शाहिदी याने अफगाणिस्तानची कॅप्टन्सी केली होती. मात्र त्याच हशमतुल्लाहला टी 20 वर्ल्ड कप टीममधून डावललं आहे. तर आयपीएलच्या 17 व्या मोसमात खेळणाऱ्या 8 खेळाडूंची वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली आहे.

या 8 खेळाडूंचा समावेश

भारतात आयपीएलच्या 17 व्या मोसमात सध्या अफगाणिस्तानचे बरेचसे खेळाडू खेळत आहेत. त्यापैकी 8 खेळाडूंना अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. या 8 खेळाडूंमध्ये राशिद खान, अझमतुल्‍लाह ओमरझई, नूर अहमद, फजलहक फारूकी, नवीन उल हक, मोहम्‍मद नबी, रहमानुल्‍लाह गुरबाज आणि गुलबदीन नईबचा समावेश आहे.

वर्ल्ड कप टीममध्ये 4 फलंदाज आहेत. यामध्ये रहमानुल्‍लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, नजीबुल्‍लाह जदरान आणि मोहम्‍मद इशाक यांचा समावेश आहे. तसेच टीममध्ये 6 अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. तर मुजीब उर रहमान आणि नूर अहमद या दोघांवर स्पिन बॉलिंगची जबाबदारी असणार आहे. या दोघांना राशिद खान, मोहम्मद नबी आणि नांग्याल खरोती यांची साथ असणार आहे. तर नवीन उल हक, फजलहक फारूकी आणि फरीद अहमद या तिघांवर वेगवान गोलंदाजाची जबाबदारी असणार आहे.

अफगाणिस्तान संघ जाहीर

अफगाणिस्तानचा पहिला सामना केव्हा?

अफगाणिस्तान क्रिकेट टीम सी ग्रुपमध्ये आहे. अफगाणिस्तानसह या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी या 5 संघाचा समावेश आहे. अफगाणिस्तान आपला पहिला सामना 3 जून रोजी युगांडा विरुद्ध खेळणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान टीम : राशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.

राखीव खेळाडू : सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई आणि सलीम साफी