
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दुसऱ्या बाजूला तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीम दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 3 मॅचची वनडे सीरिज खेळत आहे. भारताने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर जितेश शर्मा याच्या कॅप्टन्सीत इंडिया ए टीम एसीसी एमर्जिंग आशिया कप 2025 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेचं आयोजन हे दोहा इथे करण्यात आलं आहे. भारताने या स्पर्धेत यूएईचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. भारताने जितेश शर्मा याच्या नेतृत्वात हा विजय मिळवला.
भारतासमोर दुसर्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं. भारत पाकिस्तानला पराभूत करत, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र पाकिस्तानने अप्रतिम कामगिरी करत भारतावर मात केली.पाकिस्तानने यासह स्पर्धेतील आपला सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानने रविवारी 16 नोव्हेंबरला विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक दिली. त्यानंतर आता टीम इंडियाला या पराभवाचा हिशोब करण्याची संधी आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे. समीकरण जुळल्यास पुन्हा एकदा हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात.
प्रत्येक संघाला या स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळायचे आहेत. बी ग्रुपमध्ये असलेल्या टीम इंडियाने 2 सामने खेळले आहेत. तर भारत साखळी फेरीतील आपला तिसरा सामना हा ओमान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. भारताला हा सामना जिंकून उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्याची संधी आहे. तर बी ग्रुपमधून पाकिस्तान आधीच उपांत्य फेरीत पोहचली आहे.
तर ए ग्रुपमध्ये बांगलादेश ए, श्रीलंका ए, अफगाणिस्तान ए आणि हाँगकाँग या 4 संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस आहे. या ग्रुपमधून 2 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. अशात टीम इंडियाला उपांत्य फेरीत विजय मिळवून फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये विजय मिळवला तर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेतील महाअंतिम सामना होईल. अशाप्रकारे दोन्ही संघ या स्पर्धेत पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भारताने काही महिन्यांआधी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तानचा धुव्वा उडवत टी 20i आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यामुळे भारत-पाकिस्तान महाअंतिम सामन्याचं समीकरण जुळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.